स्तब्ध झालो, गुंग झालो
मग्न झालो, मुग्ध झालो
तृप्त झालो, लुब्ध झालो
तप्त ग्रीष्माच्या दुपारी
सर बरसली श्रावणी
अप्सरेसम रुप तुझे ते
पाहिले मी ज्या क्षणी || धृ ||
भरजरी लावण्य लेवुन
तू अशी येता समोरी
उमटले प्रतिबिंब गहिरे
भारलेल्या अंतरी
स्वर्गलोकातून अवतरली
परी जणु अंगणी
थक्क झालो, दंग झालो
पाहिले तुज ज्या क्षणी || १ ||
चांदण्या पडल्या फिक्या
लखलख तुझ्या तेजामुळे
चंद्रमा ठरलीस तू
सगळेच उरले ठोकळे
पूर आला नक्षत्रांचा
काळोख्या तारांगणी
थक्क झालो, दंग झालो
पाहिले तुज ज्या क्षणी || २ ||
श्वास अडला चार घटका
थांबला हृदयात ठोका
राहिले उघडेच डोळे
जणु विजेचा सौम्य झटका
मी कसे शुद्धीत यावे ?
काढे ना चिमटा कुणी
थक्क झालो, दंग झालो
पाहिले तुज ज्या क्षणी || ३ ||
- अनामिक
(११-२२/०३/२०१९, १२/०५/२०१९)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें