संवादाचा फोडू पाझर, अन् मौनावर घालू बंदी ॥ धृ ॥
नको नदी, अन् नकोच सागर.. स्वस्थ बसू इथल्या बाकावर
झटकुन टाकू रुसवा-फुगवा, राग साचलेला नाकावर
पुसून टाकू गतकाळाच्या समज-गैरसमजांच्या नोंदी ॥ १ ॥
गरम चहाने सुरू करूया थंडावलेल्या अपुल्या गप्पा
घोटागणिक चहाच्या उघडू अलगद बंद मनाचा कप्पा
इवलासा संवाद आजचा नव्या उद्याची ठरेल नांदी ॥ २ ॥
गंधासोबत ऊब चहाची हळू भिनू दे मनी खोलवर
विसरुन जाऊ कटुत्व सारे, जशी विरघळे चहात साखर
तुझ्या गोड स्मितहास्याने वाटेल चहाही जणु बासुंदी ॥ ३ ॥
- अनामिक
(२५-२८/०४/२०१७)