05 मई 2014

छंद नाही राहिला

गंध बकुळेच्या फुलांचा धुंद नाही राहिला
अन् मलाही हुंगण्याचा छंद नाही राहिला

रात्र झुरते एकटी, नसतो कुणीही सोबती
चंद्र ता-यांशी तिचा संबंध नाही राहिला

चिंब जो भिजवायचा, पाऊस तो झरतो जपुन
अन् हवेचा झोतही स्वछंद नाही राहिला

नांदतो कल्लोळ असुरी अंतरीच्या राऊळी
राम ना उरला इथे, गोविंद नाही राहिला

भासते ही वास्तवाची बंदिशाळा प्रिय अता
स्वप्नप्रासादात मज आनंद नाही राहिला

- अनामिक