27 फ़रवरी 2010

मवाली

"चला चला.. लवकर लवकर चढा.. नाहीतर मागची गाडी पकडा.." कंडक्टर नेहमीप्रमाणे बोंबलत होता. मी मात्र खुश होतो.. कधी नव्हे ते बस रिकामी होती.. आणि चक्क खिडकीची जागा मिळालेली.. मस्त हवेशीर सीट..

तितक्यात एक माणूस येऊन माझ्या बाजूला बसला. माणूस कसला ! मवालीच वाटत होता तो ! कळकट्‍ट शर्ट.. तुटलेली नसून मुद्‍दामच उघडी ठेवलेली वरची ३-४ बटणं.. लाल-केशरी कलपाने रंगवलेले केस.. हेडफोनमधलं गाणं तर इतक्या जोराने वाजत होतं, की लाऊडस्पीकरवर वॉकमन चालवला असता, तरी काय बिघडलं असतं. आणि ते कमी की काय, म्हणून स्वतःला तानसेनाचा वारसदार समजून मोठ्यामोठ्याने गात पण होता. (गात कसला.. रेकत होता म्हणा.) ’लता मंगेशकर’चा आवाज ऐकून जशी ’गानकोकिला’ या शब्दाची व्याख्या न समजावता कळावी, तसं तो म्हणजे ’छपरी’ या शब्दाची व्याख्या होता. मला तर एकदम किळस आली.. माझ्या ’मस्त हवेशीर सीट’मधली पार हवाच निघून गेली.

"टिकिट.. टिकिट.." कंडक्टर वर्गणी मागण्याच्या आवेशात. मी आधीच काढलेले. कानात (म्हणजे सगळीकडेच) गाणं वाजत असल्याने त्या ’ध्याना’चं ध्यान अजूनही कुठेतरी भलतीकडेच होतं. कंडक्टरनं डोळे वटारल्यावर कुठे त्याचं लक्ष गेलं.

"दादरला जाईल ना बस?" एकदम टपोरी स्टाईल. "हा. जायेगा." कंडक्टरची पण गुर्मी कमी नव्हती. "किती रुपये तिकीट?" "दस रुपया होयेगा." "शंभर आहेत. सुट्‍टे देता काय?" "एक पैसा छुट्‍टा नही है. छुट्‍टा निकालो."

"अहो कंडक्टर, मी मगासपासून मराठीतनं विचारतोय. आणि तुम्ही हिंदीतनं काय उत्तरं देताय? मला हिंदी येत नाही असं नाही. पण हा महाराष्ट्र आहे. तुम्ही मराठी असून काय फायदा तुमचा !"

आतापर्यंतचा त्याच्याबद्‍दलच्या तिटकारा आणि किळसाची जागा नकळत आदराने घेतली. मनात विचार डोकावला, "त्याच्यासारख्या मवाल्याला पण जे कळलं, ते तुम्हा आम्हा सुशिक्षित मराठ्यांना कधी कळणार !"

(सत्यघटनेवर आधारित.. नव्हे सत्यघटनाच)

- अनामिक
(२६-०२-२०१०)

सांग ना रे मना..

नुकताच 'झेंडा' बघत होतो. कित्ती मजा येत होती सांगू ! राजकारणातली पडद्यामागची 'कथा' जाणताना.. नेतेमंडळींच्या बुद्‍धीबळपटूंना लाजवणाऱ्या खेळी पाहताना.. गुंगून गेलेलो एकदम.. पण मध्येच त्यातलं ते गाणं सुरू झालं आणि कुठल्यातरी निराळ्याच विश्वात जाऊन हरवलो मी.. ’झेंडा’ खाली उतरवून सरळ लिहायला बसलो..

"सांग ना रे मना.. सांग ना रे मना.." त्यातली ती गोंडस, निरागस मुलगी.. सच्च्या आणि निष्पाप मनाचा तो प्रियकर.. दूर टेकडीवर जगाच्या भानगडींपासून अनभिज्ञ दोघं फक्त एकमेकांच्या सोबतीत.. आपलेपणाच्या भावनेने त्याच्या खांद्यावर टेकलेलं तिचं डोकं.. तिच्या केसांतून आणि गालावर हळूवार फिरणारा त्याचा हात.. तिने त्याच्यासाठी आणलेलं ते ’वॅलेंटाईन डे स्पेशल’ ग्रीटिंग.. अगदी साधंच.. पण डायमंड रिंगलाही लाजवेल इतकं समृदध.. ते हाती घेऊ कौतुकाने बघताना जग जिंकल्याइतका त्याच्या चेहऱ्यावर ओसंडणारा आनंद..

बाईकवर त्याच्यामागे बसलेल्या तिची त्याला अलगद मारलेली मिठी.. वासनेचा किंचितही स्पर्ष नसलेली... त्याच्या सहवासाने तृप्त झालेल्या तिच्या ओठांवरून बरसणारं तिचं मधुर हास्य.. सगळ्या जगाला विसरून मरीन ड्राईवच्या किनाऱ्यावर संथ चालणारे ते दोन जीव.. दुकानात एकमेकांना चिडवत, थट्‍टा करत, पण शेवटी एकमेकांच्या पसंतीनेच केलेली कपड्यांची खरेदी..

कुठल्यातरी रोमॅंटिक रिसॉर्टमध्ये वेस्टर्न डान्सच्या तालावर थिरकणारी त्यांची पावलं.. त्याने हलकेच ओढून घेतलेला तिचा नाजुक हात.. त्याचं बोट धरून त्याच्या भोवताली तिने घेतलेल्या गिरक्यांमधली ती धुंदी.. त्याच्या खांद्यांवर लपेटून घेतलेले तिचे कोमल बाहूपाश...

रस्त्यातल्या खुर्चीत बसलेल्या बाईच्या डोक्यातून हळूचकन काढून तिने त्याला सादर केलेलं ते गुलाबाचं फूल.. आणि त्याने आपल्या शर्टामागून काढून तिला दिलेला गुलाबाचा अख्खा गुच्छ.. त्या गुलाबाने.. नव्हे, त्या वातावरणाने भारून गेलेल्या त्या दोघांचं ते मधाळ आलिंगन...

मोगऱ्यासारखा दरवळणारा, गुलमोहोरासारखा बहरणारा आणि पारिजातकासारखा बरसणारा हा प्रेमाचा सोहळा कुणाच्याही अंगावर रोमांच उठवल्याशिवाय राहणार नाही.. मग मला तो एका निराळ्याच दुनियेत घेऊन गेला, तर नवल काय !

त्या गाण्यात रंगवलेले प्रेमाचे ते सगळे इंद्रधनुषी क्षण कधीतरी स्वतःला जगायचे आहेत मला.. कुणाच्यातरी विश्वात स्वतःला झोकून द्यायचं आहे मला.. माझ्याही नजरेत कुणालातरी हरवलेलं पहायचं आहे मला.. कुणाच्यातरी सुखदुःखांना हक्काचा आधार देणारा खांदा व्हायचं आहे मला.. कुणालातरी सतत हवाहवासा वाटणारा सहवास व्हायचं आहे मला... माझ्या भेटीने कुणाच्यातरी ओठांवर फुललेलं हसू आणि डोळ्यात तरळलेला थेंब व्हायचा आहे मला.. माझ्या दुराव्याने कुणाच्यातरी मनात दाटणारी हुरहुर जाणवायची आहे मला..

कुणाच्यातरी सोबतीत, समुद्रकिनारी, लाटांच्या साक्षीने मावळत्या सूर्याला दिलेला निरोप.. मस्करी-मस्करीत एकमेकांवर शिंपडलेलं समुद्राचं पाणी.. पुसलं जाण्याची किंचितही तमा न बाळगता रुपेरी वाळूत एकमेकांचं कोरलेलं नाव.. उद्याच्या आयुष्याचं स्वप्न उरी बाळगून चार हातांनी, पण एकजिवाने बांधलेला शंखशिंपल्यांचा बंगला... दोघांच्या ओठांतून एकत्र निघालेले प्रेमाचे फक्त चार हळवे शब्द...

हे सगळं सगळं अनुभवायचं आहे मला.. हे सगळं जगायचं आहे मला... कधीतरी असं प्रेम करायचं आहे मला.. नव्हे.. कधीतरी असं खरंखुरं प्रेम मिळवायचं आहे मला...

- अनामिक
(२६-०२-२०१०)

25 फ़रवरी 2010

नशीब

एक तास झाला तरी ही खटारी बस जागची हलत नाही म्हणजे काय ! एक तर पाच वाजताची ट्रेन आहे बेळगावहून. आणि चार वाजले तरी इथे आडगावात ही बस सोडतच नाही भिकारडा ड्राईव्हर !

साला! सकाळपासून दिवसच खराब होता माझा. इथे बेळगावापासून अजून आत कोपऱ्यात कुठल्याशा खेडेगावात लग्नाला निघालो होतो काल बॅंगलोरहून. ट्रेनपर्यंत तर ठीक.. पण सकाळी बेळगावला पोचून कळलं की बसचा संप होता. कित्ती तारांबळ झाली माझी इथवर पोचताना सांगू! कित्ती कित्ती वाहनं बदलावी लागली.. सुरुवातीला त्या माजोरड्या रिक्षावाल्यांनी लुटलं... मग बाईक काय.. ट्रक काय.. लुना काय.. किती ती दिव्य इथवर पोचायला ! डोक्याचं खोबरं झालं पार !

बरं लग्न आटपून परत जायला निघालो, तर काही साधनही मिळेना बेळगावला पोचायला. एक तासाने कुठे ही मिनीबस आलेली, तर ती पण अजून एक तास तिथेच उभी ! आता हिला उशीर झाला, तर ट्रेन चुकलीच समजा ! मग बसतो बोंबलत ! छ्या.. नशिबच वाईट आहे माझं !

तितक्यात एक हडकुळासा माणूस कुबड्या घेऊन अडखळत अडखळत बसमध्ये चढला. एक पाय नव्हता बिचाऱ्याचा गुडघ्याखालून. कसाबसा धडपडत कुठेतरी जागा शोधून बसला तो.. चेहऱ्यावरचे भाव अतिशय कोरडे. डोळे मात्र खोल कुठेतरी पाणी तरंगत होतं.

समोरच्या सीटवरच्या माणसानं आश्चर्यानं विचारलं, "काय रं पांडू? ह्यं असं कसं काय झालं ?" पांडूच्या तोंडून शब्द फुटेना. कंठ दाटून आला असणार त्याचा. "काय सांगू रंगा. मला ही डायबिटिसची बिमारी. त्यात घरचा मी एकला कमवता. रोज शेतावर दिसरात मजुरी करनारा. दोन हप्त्यांपूर्वी शेतात पायाला गंजका सुरा लागून लय जखम झाली. रक्त थांबंना. डाक्टरकडे गेलो, तर म्हनं चांगल्या हास्पिटलात भरती व्हायला पायजेल." "मग झालास नाय काय भरती?" "आरं, हितं दोन टायमाच्या जेवनाचं वांदं.. आनि हास्पिटलाचं पैसं कुठनं आनलं असतं? म्हनलं तसंच होईल बरं. पन जखम काय भरंना. मग एक दिस सुद्‍धच गेली. जाग आली तवा बघला तर एक पायच नाय ! डाक्टर बोलले, की टायमाला आलो असतो हास्पिटलात, तर पाय वाचला असता."

पांडूचा केविलवाणा चेहरा बघवेना. "दोन पोरी हायत. त्यांची शाळा! मग लगीन! आईस पडलीय रोगात. आणि देवानं आसं बसवलाय मला ! कसं करू मी तुच सांग ना रं रंग्या !" रंगा अवाक ! उत्तरच नव्हतं त्याच्याकडं. एकच वाक्य त्याच्या तोंडून फुटलं, "सगळं नशिबाचं भोग हायत पांडू !"

अचानक एक प्रश्न छळू लागला ! बारीक-सारीक गोष्टीत सतत कुरबुर करत नशिबाला दोष देणाऱ्या आपलं नशीब खरंच इतकं वाईट आहे का ?

-अनामिक
(२४-०२-२०१०)