09 अगस्त 2001

फुलराणी

रिमझिम रिमझिम बरसत होत्या हळव्या श्रावणधारा
पाखरांसवे धुंदगतीने खेळत होता वारा
पाने होती गात सुराने चैतन्याची गाणी
कुठून चाहुल गोड लागली, दिसली मज फुलराणी

सोनपावलांच्या नादाने तिचे आगमन झाले
वर्षाजलात इंद्रधनूचे रंग मिसळले ओले
गंध मृदेचा द्विगुणित केला तिच्या पदोस्पर्शाने
आसमंतही भरून आला सळसळत्या हर्षाने

शुभ्र विजांची मैफल जमली गगनी फेर धराया
मेघांचाही पूर लोटला फुलराणीस पहाया
सौंदर्याने तिच्या मिळाला नूर नवा गगनाला
पहा चंद्रही कसा लाजला तिच्या गौरवर्णाला

हृदय धडकले पाषाणांचे मंजुळ तिच्या स्वराने
तिच्या मुखीचे गीत ऐकण्या वळली पाने-पाने
करस्पर्शाने तिच्या बहरला प्रेमफुलांचा वाफा
तिच्या निरागस लीलांवरती खुदकन हसला चाफा

जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी तिने फुलवला श्वास
रंगबिरंगी नवस्वप्नांची जगी विखुरली रास
आगमनाने फुलराणीच्या रचली एक कहाणी
चराचराने अस्तित्वाची तिच्या गायली गाणी

- अनामिक
(०९/०८/२००१)

23 जून 2001

हाक

का रुसलीस प्रिये, तुटली का क्षणात प्रीती सारी ?
चाललीस का दूर दूर मग सोडुन साथ अधूरी ?

आनंदाच्या पावसात तू, दुःखाच्या दुष्काळी
साथ दिलीस मला विरलेल्या भकास सांज-सकाळी
कधी यशाच्या मुकुटामध्ये चमचमणारा मोती
पराभवाच्या तिमिरामध्ये तूच उजळल्या ज्योती

हास्याचा क्षण जगतानाही फुलवलेस तू ओठ
दिलीस हिम्मत रिचवायाला तू अश्रूंचा घोट
काट्यांनी भरलेला रस्ता, कधी फुलांची वाट
पार कराया दिलास हाती तू प्रेमाचा हात

कोण तुझ्यावाचून भावना समजुन घेइल माझ्या
स्पर्शावाचुन तुझ्या, मनाच्या जखमा उरतिल ताज्या
आर्त वेदना तळमळेल मग काळजात जळणा-या
तुझ्या फुंकरीविना कधी या ठिणग्या विझतिल सा-या

साद घालतो, ये माघारी, शतदा पडतो पाया
तुझ्याविना हे जीवन म्हणजे प्राणांवाचुन काया
क्षमा मागतो गुन्हा कोणता घडला असला त्याची
किती याचना करू, ऐक ना हाक तुझ्या वेड्याची

- अनामिक
(२१,२२,२३/०६/०१)


(संदर्भ - ही कविता ’कविते’ला, म्हणजेच  काव्याला उद्देशून लिहिलेली आहे. या कवितेतील सखी म्हणजे ’कविता’ आहे.)

31 मई 2001

क्षितिज

रंग उधळले कुणि आकाशी
क्षितिजावर ओघळली लाली
ओठांच्या दाबून पाकळ्या
जणु युवती गालात लाजली

सांजवात सुटला वेगाने
क्षितिजाला बिलगाया आतुर
जणु सूर्याने आभाळातुन
हळुच घातली शीतल फुंकर

लालबुंद तेजाचा गोळा
दिनकर अवतरला क्षितिजावर
जणु प्रेमाने मोहरलेल्या
स्वप्नप्रियेला भेटे प्रियकर

बुडू लागला सूर्य सागरी
अंधाराने विणले जाळे
जणु क्षितिजाने वस्त्र नेसले
चमचमत्या ता-यांचे काळे

- अनामिक
(मे २००१)

24 अप्रैल 2001

कविता

कविता असते मनी उमलत्या भावनांचा फुलोरा
श्रावणातल्या रिमझिमणा-या ओल्या विचारधारा

कविता असते रंगबिरंगी आकांक्षांची थाळी
डोळ्यामध्ये अंकुरलेल्या स्वप्नांची रांगोळी

कविता असते आनंदाच्या धुंदीचा हुंकार
आत कोंडलेल्या अश्रूंना पाझरणारे द्वार

कविता असते रेशिम झालर सौख्याच्या वस्त्राला
दुःखाचीही सुरेख गुंफण करणारी फुलमाला

कविता असते सरस्वतीचे तेजस्वी वरदान
मनामधे जपलेले हिरवे नाजुक पिंपळपान

- अनामिक
(२४/०४/२००१)

14 मार्च 2001

श्रीमंत - गरीब

श्रीमंतांचे इथे चोचले
कोण पुसे गरिबाच्या इच्छा
धनिकावर वर्षाव सुखाचा
दुःख करी गरिबाचा पिच्छा ॥ धॄ ॥

वस्त्र भरजरी लेउन अंगी
धनिक करी श्रृंगार नाटकी
शरिर लपवण्या पुरी न पडती
गरिबाची लक्तरे फाटकी ॥ १ ॥

टोलेजंग महालांभवती
सोनेरी जाळ्यांचे कठडे
ऊन-पावसा इथे थरथरे
जुने मोडके अधू झोपडे ॥ २ ॥

मिष्ठान्नाचे ताट गिळुनिया
कुणि देतो तृप्तीचा ढेकर
रित्या मुखाला नशिबी नाही
एक वेळची भाजी भाकर ॥ ३ ॥

समृद्धीची नदी वाहते
धनवानाच्या खुल्या अंगणी
निर्धनास अपुल्या न आवरे
नयनी ओघळणारे पाणी ॥ ४ ॥

- अनामिक
(१४/०३/२००१)

15 फ़रवरी 2001

शोध

येईल कुणी मजसाठी
हृदयात घेउनी प्रीती
या खुळ्या भावनेपायी
शून्यात शोधतो नाती

सतरंगी इंद्रधनूच्या
शोधतो कुणाचा चेहरा
डोळ्यात रंग प्रेमाचा
जलधीहुन ज्याच्या गहिरा

वाळूतिल रेषांवरती
शोधतो कुणाचे नाव
स्पर्शाने कळतिल ज्याला
चित्तातिल कोमल भाव

बेधुंद चांदण्या रात्री
पाहतो कुणाची स्वप्ने
स्वर मिसळुन स्वरात माझ्या
कुणि गाइल मधुर तराणे

श्रावणसरीत रिमझिमत्या
पाहतो कुणाची वाट
भिजवेल चिंब हृदयाला
बांधेल रेशमी गाठ

- अनामिक
(१४, १५ /०२/२००१)

12 जनवरी 2001

शुभेच्छा

गंध फुलांचा घेउन मोहक तुझा जन्मदिन आला
तुजसाठी नवचैतन्याचा वसंत ऋतू बहरला
आयुष्याने तुला चढवला नव्या वयाचा साज
असंख्य देतो तुला शुभेच्छा मनापासुनी आज


मनी फुलव तू नवीन स्वप्ने, नव्या नव्या आकांक्षा
आयुष्यात यशस्वी हो तू सगळ्या कठिण परिक्षा
सफल होउ दे तुझ्या मनीषा, तुझे ध्येय, अन् आशा
असेल याहुन दुसरी तिसरी माझी काय अपेक्षा


दुख, निराशा स्वप्नालाही तुझ्या कधी ना येवो
हास्य तुझ्या या चेह-यावरचे सदैव चमकत राहो
आनंदाची नित्य तुझ्यावर होऊ दे बरसात
सुख, समृद्धी आणि यशाची तुला मिळू दे साथ


दीर्घायुष तू होशिल, करतो प्रार्थना ईश्वरास
नाव स्वताचे उज्वल करशिल, आहे मज विश्वास
वाटेवरती चालताना यशाच्या तू, तुजसाठी
माझ्या नित्य सदिच्छा असतिल वळणा-वळणावरती


- अनामिक
(१२/०१/२००१)