25 मार्च 2010

अशी पाखरे येती.. आणिक स्मृती ठेउनी जाती..

"बाळा, एक bad-news आहे." कापऱ्या आवाजात फोनवर आई म्हणाली.
"काय झालं आई ?" माझाही जीव इथे कासाविस.
"अरे.. सर off झाले.."
"क्काय ???"
जेके सर.. गेले...

हे काय ऐकलं मी आता.. काहीच कळेना.. काहीच सुचेना.. पाय जागचा हलेना.. इतका मोठा धक्का मनाला पेलवेना...

जयकीर्ती कळसकर.. उर्फ जे.के. माझ्या मित्रमंडळींपैकी सर्वात साधी आणि सरळ व्यक्ती. राहणीमानानेही आणि मनानेही. कधीही कुणाबद्‍दल मनात कपट नाही की काळंबेरं नाही.. कुणाच्या अध्यात ना मध्यात.. ना कधी कुणाला दुखावलं असेल. कुठल्या गोष्टीचं चेहऱ्यावर कधी tension नाही. एकदम 'cool' आणि प्रसन्न असं व्यक्तिमत्व.

आमची ओळख मी VJTI मध्ये B.E. च्या third year ला असल्यापासूनची. जेके सर तेव्हा M.Tech. च्या first year ला होते. M.Tech. च्या विद्यार्थ्यांना teaching assistantship म्हणून professors ना काहीतरी मदत करावी लागते. तसेच जेके सर हे आम्हाला कुठल्यातरी practical ला assistant म्हणून होते. तसे इतर practicals ना M.Tech. चे इतर विद्यार्थीही assistant म्हणून होते आम्हाला. त्यांची आम्ही B.E. वाले लोक मनसोक्त टिंगल करत असू. पण जेके सरांविषयी मात्र सुरुवातीपासूनच मनात आदर निर्माण झालेला. म्हणून तर वयाने फक्त २-३ वर्षं मोठे असूनही मी त्यांना तेव्हापासूनच ’जेके सर’ असंच संबोधत आलोय.

जसा जसा परिचय वाढत गेला, तसं तसं ओळखीचं रुपांतर मैत्रीत होऊ लागलं. Final year ला आम्ही दोघेही एकाच professor खाली project करत असल्याने एकाच lab मध्ये काम करू असू. त्यामुळे गप्पागोष्टी तर नेहमीच रंगू लागल्या. अगदी technical विषयांपासून ते gossips पर्यंत सगळं सगळं. काही जवळचे मित्र सोडले, तर माझ्या वर्गातल्या मुलांपेक्षाही मला जेके सरांविषयी अधिक ओढ आणि जवळिक निर्माण झाली होती. काही व्यक्तींशी ’तार जुळणे’ म्हणतात ना, तसंच काहीसं. गणपतीला आमच्या घरी भेट देऊन गेल्यामुळे आईलाही त्यांचा चांगला परिचय झालेला.

आठव्या semester मध्ये माझा GATE चा निकाल लागला. तेव्हा तर M.Tech. साठी कोणत्या colleges ना apply करायचं, कोणत्या college मधली कोणती branch चांगली आहे, forms कुठे विकत घ्यायचे आणि कसे भरायचे, या सगळ्या बाबतीत जेके सरांनी जितकं मार्गदर्शन आणि मदत केली असेल, ते मी कधीच विसरू शकणार नाही. IISc ला फक्त काही Top Rankers ना admission मिळते, अशा समजाने मी तर form ही विकत घेणार नव्हतो. फक्त जेके सरांच्या आग्रहाखातर मी IISc चा form भरला. त्यातही मला अमुक एका branch मध्ये त्यावेळेस विशेष रस वाटत असल्याने मी तो एकच option भरणार होतो. पण त्यांनी मला दटावलं, "IISc तला C.E.D.T. (Center for Electronics Design and Technology) हा भारतातला नंबर १ course आहे electronics साठी. तेव्हा बाकी काही नाही भरलंस तरी चालेल. पण तो option सोडू नकोस." IISc तल्या कुठल्यातरी मित्राला फोन लाऊन त्यांनी CEDT विषयी माझं शंकानिरसनही करून दिलं.

पुढे CEDT तून Test आणि Interview साठी call आला. Test आणि Interview देऊन आलो. आणि एके दिवशी CEDT मध्ये admission मिळाल्याचं पत्र घरी आलं. कित्ती कित्ती आनंद झालेला म्हणून सांगू. पण हा आनंद share करायला सगळ्यात पहिला phone मी कुणाला केला असेल. अर्थातच जेके सरांना. कारण या आनंदावर आईच्या आशिर्वादांनंतर पहिला हक्क कोणाचा असेल, तर तो जेके सरांचा. त्यांच्या आग्रहाशिवाय तर मी CEDT चा option ही भरणार नव्हतो.

पुढे म.तेच. साठी मी बॅंगलोरला निघून आलो. आणि सर नोकरीसाठी मुंबईलाच roommates सोबत राहू लागले. सुरुवातीला वरचेवर फोनाफोनी होत असली, तरी नंतर अभ्यासाच्या नादात म्हणा, किंवा नव्या विश्वात हरवून गेल्यामुळे म्हणा, phones ची संख्या कमी कमी होत गेली. चॅटिंगही रोडावत गेलं. बऱ्याच महिन्यांनी ते एकदा online दिसल्यावर मी ping केलं. तर तेव्हा म्हणाले, की ते महिनाभर हॉस्पिटलमध्ये होते. पण details काही सांगितल्या नाहीत. न रहावून मी दुसऱ्या एका मित्राला फोन लावला, तर त्याच्याकडून कळलं, की सरांच्या दोन्हीही किडन्या fail झाल्यात. त्यासाठीच त्यांना महिनाभर हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागलेलं.

माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. एक अतिशय साधी सरळ आणि निर्व्यसनी व्यक्ती.. कुणाच्या अध्यात ना मध्यात.. आणि देव त्यांच्यासोबत हे असं निष्ठुर कसं वागू शकला !! कधी एकदा त्यांना जाऊन भेटतोय असं झालं. पण भेट मात्र माझं semester संपल्यावरच शक्य झाली. त्यांना पाहून माझे डोळेच भरून आले.. चेहरा आणि अंग तर पार सुकून गेलेलंच, पण चेहऱ्यावरचं तेज पण त्या आजाराने पार लुटून नेलेलं. त्यांना भेटायला तेव्हा माझे अजून १-२ मित्र सोबत होते म्हणून बरं. नाहीतर मला काय बोलू अन कसं बोलू, काहीच कळत नव्हतं. आठवड्यातून दोनदा dialysis करून जगत होते बिचारे. पण तरीही बोलण्यात कुठेही निराशा नव्हती. चेहऱ्यावरचं तेज जरी हरवलं असेल, पण मनातली हिम्मत आणि जिद्द मात्र देव अजूनही हिरावून घेऊ शकला नव्हता. सुदैवाने त्यांच्या आईची एक किडनी त्यांना दिली जाऊ शकेल, असा एक आशेचा किरण डॉक्टरांनी दाखवला होता. मलाही तेवढंच समाधान वाटलं.

पुढे IISc-CEDT च्या शिक्क्यामुळे चांगल्या Electronics कंपनीत नोकरी लागली मला. त्याचंही श्रेय आईच्या आशिर्वादांसोबतच सरांच्या ’त्या’ सल्ल्याला द्यायला माझं मन विसरलं नाही.

नोकरीच्या व्यापात मी पुन्हा बॅंगलोरमध्ये बुडून गेलो. पण माझी आई नेहमी सरांची फोनेवर चौकशी करत असे. आणि मला त्यांच्या तब्येतीची update देत असे. तब्बल दीड वर्षांनंतर मागच्या October मध्ये सगळ्या conditions अनुकूल झाल्यानंतर सरांचं Kidney Transplant चं operation ठरलं. दीड वर्षं ते फक्त dialysis वर होते, या कल्पनेनेही किती वेदना होतात. Operation च्या काही दिवस आधी योगायोगाने मी मुंबईला गेलेलो. पण फार प्रयत्न करूनही त्यांच्या आणि माझ्या वेळा आणि भेटीचा योग जुळला नाही.

Operation यशस्वी झालं. आणि त्यांच्या आईने त्यांना किडनीरूपे पुनर्जन्मच दिला. काही महिन्यांच्या सक्त विश्रांतीनंतर सर ठणठणीत बरे होतील, आणि पूर्वीसारखं normal आयुष्य जगू शकतील, या बातमीने मी आनंदून गेलो. वाट पहात होतो, ते एका प्रत्यक्ष भेटीची.

आणि तो योग मागच्या महिन्यातच जुळून आला. सरांची तब्येत ३-४ महिन्यातच व्यवस्थित recover झालेली. कोल्हापूरला त्यांच्या गावी एका engineering college मध्ये lecturer म्हणून नोकरी लागलेली त्यांना. आणि ते काही दिवसातच मुंबई सोडून जाणार होते, म्हणून माझ्या आईने त्यांना घरी जेवायला बोलावलं होतं. नेमका मीही काही कामानिमित्त त्या दिवशी मुंबईला गेलेलो. सरांना पाहिलं आणि फार फार आनंद झाला. योग आणि भेट, दोन्ही जुळून आलेलं. त्यांच्या चेहऱ्यावरचं हरवलेलं तेज परत चमकताना पाहून खोल कुठेतरी समाधान वाटलं. college-company तल्या गमतीजमती, त्यांच्या लागलेली नोकरी, गावी जाऊन settle व्हायचा plan, गावची थंडी, गावी अतिस्वस्तात मिळणाऱ्या भाज्या, अशा चिक्कार गप्पा झाल्या. पुन्हा कधी त्यांची भेट होईल आणि त्यांच्याशी अशा दिलखुलास गप्पा रंगतील, हे ठाऊक नसूनही मी शुभेच्छा देऊन प्रसन्न मनाने त्यांना निरोप दिला. कारण एक आयुष्य मरणाच्या दारातून परत येऊन पुन्हा जीवनाच्या दिशेने वाटचाल करणार आहे, या जाणिवेतच माझा सगळा आनंद सामावलेला.

आणि आईचा अचानक आता फोन. ’सर गेले...’ मन सावरता सावरेना. गोठलेला मेंदू चालेना. भरलेली छाती पुन्हा श्वास घेईना.

मरणाशी जिद्‍दीने झुंज देऊन आपला जीव परत जिंकलेल्या मानवाचा यमराजाने असा पाठीत वार करून पराभव करावा !! एका मातेने आपल्या बाळाला दिलेला पुनर्जन्म नियतीने स्वतःच व्यर्थ घालवावा !! एका निष्पाप व्यक्तीचा असा दुर्दैवी अंत व्हावा !!

कारण काय ते अजूनही समजलं नाहीये मला. पण समजूनही काय फायदा ! एका चांगल्या मित्राला.. नव्हे चांगल्या व्यक्तीला मी कायमचा मुकलोय, हे कटुसत्य थोडचं बदलणार आहे त्याने !

सर.. तुम्ही जिथेही असाल तिथून ऐका.. काही ऋण फक्त व्यक्त करता येतात. फेडता येत नाहीत. आज मी जिथे आहे, ते तुमच्या M.Tech. Admission वेळच्या मार्गदर्शनामुळे आणि ’CEDT चा option' भरण्याच्या सल्ल्यामुळे आहे. तो सल्ला नसता दिलात, तर मी कुठेतरी जरूर असतो.. पण जिथे आहे तिथे मात्र नक्कीच नसतो...

(२३-०३-२०१०)
(हा लेख म्हणजे केवळ माझी जेके सरांबद्‍दलची कृतज्ञता असून त्यामागे अन्य कुठलाही हेतू नाही.)

24 मार्च 2010

(बेळ)गावाकडलं लगीन

(ही कथा एका सत्यघटनेवर आधारित आहे. तेव्हा यातील घडामोडी हा केवळ योगायोग नसून खरोखरचे भोग आहेत, हे वाचकांनी लक्षात घ्यावे. काही वर्णन अगदी किंचितसं अतिशयोक्त असेलही. पण त्यामागील उद्देश हा केवळ विनोदनिर्मिती असून कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही.)

आजकाल लग्न म्हटलं, की सगळ्यांचे कान टवकारतात. छे हो ! उगाच विचारपूस करू नका. माझं नाहीये इतक्यात.. माझ्या मित्राच्या ताईचं लग्न होतं परवा. ते पण पुण्या-मुंबईतल्या कुठल्याही सामान्य हॉलमध्ये नाही ! तर ऐतिहासिक महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरच्या ज्वलंत अशा बेळगावानजिकच्या कुठल्याशा खेडेगावात. मित्र अगदीच खास असल्याने न जाण्याचा प्रश्न तर नव्हताच, पण ’कुठल्या आडगावात ठेवलंय लग्न !’ अशी कुत्सित भावनाही मुळीच नव्हती.

सन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी. तशी ताईच्या लग्नाला ’तत्काळ’ तिकिटापासून माझी तयारी. ’बॅंगलोर ते बेळगाव’ ट्रेनचं तिकीट ! रोज ऑफिसला जायलाही दहाच्या आधी न उठणारा मी, तत्काळ तिकिटासाठी मात्र बरोब्बर आठच्या आधी उठतो. घरच्या नेटचा ऑर्कुटिंग आणि चॅटिंग सोडूनही काही उपयोग असतो, याची जाणिव मला अशा प्रसंगीच होते.

लग्नाला निघायचा दिवस आला. रात्री सव्वा नऊ ची ट्रेन असल्याने ऑफिसमधून लवकर निघणं भाग होतं. साडे-सातच्या आधी ऑफिसातून निघणे, हा आमच्या टीममध्ये (अलिखित) गुन्हा समजला जातो. आणि मी तर चक्क सहा वाजताच निघण्याचा मनुष्यवधासमान अपराध करत होतो. लोकांच्या नजरा चुकवत मी गुपचुप बाहेर पडत होतोच; तितक्यात शेजारच्या टीममधल्या एका मित्राने खवचटपणे हटकलंच. "इतरांना वेळेचं तत्त्वज्ञान शिकवणारे आज स्वतः इतक्या लवकर कसे !!" अशा प्रसंगी माणसाने सरळ निर्लज्ज व्हावं आणि काढता पाय घ्यावा.

माझ्या बाईकचा (आणि इतर वाहनचालकांचा) छळ करत मी घरी पोचलो. इस्त्री करणे, डबा भरणे, बूट पॉलिश करणे (म्हणजे साधी बुटावरची धूळ झटकणे हो.) अशी अतिकष्टाची कामं आवरुन मी बॅग भरली आणि लगबगीने बसस्टॉपकडे निघालो. बॅंगलोरच्या रिक्शावाल्यांशी माझे शिवसेना-कॉंग्रेस इतके घनिष्ठ संबंध असल्यामुळे मी बी.एम.टी.सी. बसलाच वोट दिले. माझे घर ते रेल्वेस्टेशन हे १० किलोमीटर इतकं प्रचंढ लांबलचक अंतर, पाऱ्यापेक्षा जास्त घनतेच्या ट्रॅफिकमधून फक्त ४५ मिनिटांमधे पादाक्रांत करणाऱ्या ड्राईव्हरचं मला अतिशय कौतुक वाटलं. पुष्पगुच्छ आणि शाल वगैरे विकत आणून ड्राईवरचा सत्कार करण्याइतका वेळ नसल्यामुळे मी स्टेशनकडे चलुक पडलो.

मुंबईला जाणारी ट्रेन ही प्लॅटफॉर्म १ वरून सुटते. पण बेळगाववाली ही ट्रेन प्लॅटफॉर्म ८ वर लागलेली. तंगडतोड करत मी तिथवर पोचलो. ट्रेनचं नाव ’राणी चेन्नम्मा एस्प्रेस’ !! या नावावरून मला ’चिन्नम्मा चिलकम्मा चुडु चुडु चुडु’ या अतिशय श्रवणीय गाण्याची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. या गाण्यातील एकाही ओळीचा (तमिळ नाही ! हिंदीच !!) अर्थ जर कोणी मला सांगू शकला, तर त्याची गिनीज बुकात शिफारस करण्यासाठी मी हवी ती खटपट करायला (एका पायावर) तयार आहे.

कंपार्टमेंटमध्ये शिरलो, तर कधी चुकून समोरच्या सीटवर एखादी गोड पोरगी असावी, तिच्याशी चार गुलूगुलू गप्पा व्हाव्यात, असं माझ्या स्वप्नातही कधी घडत नाही हो !! माझ्या कंपार्टमेंटमध्ये यावेळीही काकवा, आज्ज्या आणि बापयेच !! काय बोलणार कोणाशी ! अशा बिकट प्रसंगी ’हॅरी पॉटर’च माझ्या साथीला धावून आला.

'हॅरी पॉटर'चा मी जबरदस्त फॅन आहे. बी.ई. फर्स्ट ईयरला असताना बाकीचे मित्र काही ना काही वाचन करत आहेत (गैरसमज करून घेऊ नका, इंजीनिअरिंगच्या पुस्तकांचं वाचन ’प्रिपेरेशन लीव्ह’शिवाय कोणीच करत नसतं !!) हे पाहून शरमेने आपणही काहीतरी वाचलं पाहिजे, म्हणून हॅरी पॉटर वाचायला मी सुरुवात केली. हळूहळू इतका इंटरेस्टिंग वाटू लागला हॅरी, की रोज सकाळ-संध्याकाळ बसमधे तब्बल २०-२० मिनिटे मी हॅरी पॉटर वाचण्याशिवाय काहीच करत नसे. अशा प्रकारे फक्त एका वर्षात एक असे ६ एपिसोड्स वाचून पण झालेत माझे.. ते पण २,१,४(अर्धा),३,४(उर्वरित),५,६ अशा मॅजिकल सिक्वेंस मध्ये !! सातवा एपिसोड तर मला इतका आवडलाय, की २ वर्षं झाली, अजुनही हातून सोडवत नाही. वर्षातून दोन-तीनदा जेव्हा बॅंगलोरहून घरी मुंबईला जातो, तेव्हा ट्रेनच्या प्रवासात गाणी ऐकून ऐकून मोबाईलची बॅटरी उतरली, आणि कुठेही चार्जिंग पॉईंट रिकामा मिळाला नाही, की मी लगेचच वाचन चालू करतो. २ वर्षात चक्क २०० पाने संपवलीयत मी.

बुकमार्क होता, म्हणून बरं. नाहीतर मागल्यावेळी कुठवर सोडलेलं, हे मला अख्खं पुस्तक एका दमात वाचून पण आठवलं नसतं. १० पानं वाचून नाही झाली, तेव्हाच माझे डोळे इतके पेंगायला लागले, की चिमटे लावूनही उघडे राहिले नसते. शेवटी मनावर दगड ठेवून मी पुस्तक बंद केलं. यावेळीही हॅरी पॉटरच कामी येणार होता. कसा ? अहो उशी नव्हती ना घेतली मी सोबत ! उगाच का हे लोक इतकी जाडजुड पुस्तकं छापतात !

सकाळी साडेआठला बेळगाव येणार होतं. आणि चिंतेची गोष्ट म्हणजे ते शेवटचे स्टेशन नव्हतं. त्यामुळे ’मला वेळीच जाग नाही आली तर’ या कल्पनाविस्तारात अख्खी रात्र निघून गेली. पण झोप काही लागली नाही. शेवटी साडेसातला फिजिकली उठून बसलो. बाहेर कुठलंसं स्टेशन आलेलं. टाईमटेबल पाहिलं, तर फक्त दोनच तास उशिरा होती ट्रेन. इतकी जलदगती इंडिअन रेल्वेसाठी बरी नव्हे ! शेवटी ८ वाजता टाईमटेबलवर येणारं बेळगाव १० वाजता रुळांवर आलं, आणि त्या पुण्यनगरीत माझं पाऊल पडलं.

लग्न होतं ११.४३ चं. (नशीब ! सेकंद छापत नाहीत मुहुर्तात !) ताईने पत्ता तर व्यवस्थित सांगितलेला. स्टेशनवरून रिक्शा करून बसस्टॅंडवर यायचं. तिथून चिक्कार बसेस जातात म्हणे लग्नगावी. बाहेर रिक्षावाल्यांची बरीच गर्दी होती. भाजी मार्केटमध्ये भाव विचारतात, तसा मी एकेका रिक्षावाल्याला बसस्टॅंडपर्यंतचा भाव विचारू लागलो. २-३ किलोमीटर अंतरासाठी ५० ते १०० मधले सगळे अंक ऐकून झाले माझे. पण कोणतीही भाजी.. आपलं रिक्षा पटेना !

आणि अचानक केवळ ३० रुपये भाव सांगणारा एक रिक्षावाला (नव्हे, देवमाणूसच म्हणावा लागेल) भेटला. अधिक विलंब केला, तर ही (ऑलमोस्ट) ’फ्री सीट’ गमावून शेवटी ’पेड सीट’च घ्यावी लागेल हे जाणून मी त्या रिक्षात ऍडमिशन घेतलं. (उगाचच इंजिनीअरींग ऍडमिशनची आठवण !) इकडच्या तिकडच्या बेळगावातल्या मराठी-कन्नड टक्केवारीच्या गप्पा करत त्याने मला बसस्टॅंडपाशी सोडलं. आणि मला फर्स्ट सेमीस्टर पास झाल्याचा आनंद झाला !

बसस्टॅंडमध्ये बघतो तर काय ! जणू काही माझ्याच स्वागतासाठी अख्खा बसस्टॅंड रिकामा करण्यात आला होता. एकही बस दिसेना. २-३ ड्राईवर-कंडक्टर सदृष्य मंडळी दिसली. मी लगेच सरसावलो. माझ्या पुढ्यात एक मोठ्ठा गहन प्रश्न पडला. यांच्याशी बोलू तरी कोणत्या भाषेत? मराठी, हिंदी की कन्नड ? कन्नडशी अद्याप सलगी झालेली नसली, तरीही एक मास्टर वाक्य शिकून ठेवलं आहे, जे हमखास सगळीकडे चालतं. ’कन्नडा गोथ्थिल्ला’. म्हणजे ’मला कन्नड येत नाही’. तरीही बेळगावात मराठी लोकांचं प्राधान्य आहे, अशा समजुतीने मी मराठीतच सुरू केलं, "कोवाड-दुंडगेला बस कुठून मिळेल?" (गावाचे नाव कित्ती मधुर आणि अनोखं आहे नाही !) तर त्या माणसाने लिंब चावल्यासारखं तोंड केलं, आणि अर्धमराठी-अर्धहिंदीमधून उत्तर चालू केलं. (त्यापेक्षा अर्धमागधीमधून सांगितलं असतं, तरी बरं झालं असतं !) त्याच्या म्हणण्याचं तात्पर्य होतं, की "आज बेळगावात बसचा संप आहे !" का? तर म्हणे मराठी-कन्नड भाषिक प्रांतीय वादामुळे बस बंद !! इतकी वर्षे आम्ही फक्त घरी बसून जांभया देत थंड डोक्याने ’ज्वलंत सीमा प्रश्ना’च्या बातम्या ऐकत आलोय. पण कर्म-धर्म-संयोगाने आज त्याच आगीने मला ग्रासलं होतं. डोक्यात मोठी घंटा वाजली, की आतापर्यंत केला, तो प्रवास नाहीच ! खरा प्रवास तर आता सुरु होणार आहे !!

स्टॅंडमधून बाहेर आलो. पाण्यात गळ टाकून बसलेल्या कोळ्यांना चार-पाच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर एक छोटा मासा दिसावा, तसा मला कावराबावरा बघून भरपूर रिक्षाचालकांनी वेढा घातला. क्षणैक मला सेलेब्रिटी असल्यासारखं भासलं. सगळ्यांनी एकत्रच ’कुठे जायचंय’ ची सरबत्ती सुरू केली. मी पुन्हा त्या गावाचं अनोखं नाव जाहीर केलं. आयताच बकरा गावलाय, पाहून एकाने सुरी चालवली, "तीनसौ रुपया होगा."

तीनशे !!! मल भुकंपाचा सूक्ष्म धक्का जाणवला. बॅंगलोर ते बेळगाव या ६०० किलोमीटरचे मी २७५ रुपये मोजलेले. आणि हा ३० किलोमीटरचे ३०० म्हणे !! मी विधानसभेतून वॉक-आऊट करू लागलो. तसा सगळा लवाजमा माझ्या मागून. घड्याळ पाहिलं. वाजलेत १०:२०.. आणि मुहुर्त ११:४३.. (बहुत नाइन्साफी है सांबा !) आणि पुढचा प्रवास अंधारात ! माझी अवस्था खरोखर कचाट्यात सापडलेल्या माशागत झालेली. कुठल्यातरी जाळ्यात गुंतावंच लागणार होतं मला. त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे कुठल्या जाळ्यात पडायचं, हा ऑप्शन माझ्याकडे होता. (नको तिथे ऑप्टिमिस्म !)

त्याच्यातल्या एका भल्या (?) आणि मराठी (पुन्हा ?) वाटणाऱ्या कोळ्याकडे.. आपलं.. रिक्षावाल्याकडे सरसावलो. त्याने मला एक निराळाच उपाय सांगितला. म्हणे, की मला एका अमक्या-तमक्या नाक्यावर सोडतो. (नाव पुन्हा अनोखं होतं. पण लक्षात नाही राहिलं.) तिथून मला कोवाडला जाण्यासाठी २०० टक्के ५० प्रकारची वाहनं मिळतील. मी शरणागती पत्करली. वेळ कुठे होता डोकं लढवायला !

उमेदवार मतं मागायला पण जात नसतील, असल्या गल्लीबोळातून आमची सफारी जात होती. काय करणार ! लवकरात लवकर पोचव अशी ताकीदच दिलेली रिक्षावाल्याला. (म्हणजे विनंती केलेली, असं म्हणायचं होतं मला.) १०-१५ मिनिटात त्याने गावाबाहेरच्या कुठल्याशा सुनसान नाक्यावर आणून रिक्षा थांबवली. आणि म्हणे, "इथून भरपूर टेंपो नाहीतर कार नाहीतर बाईकवाले जातात उचगावला. कोणालाही हात दाखवा. लगेच लिफ्ट मिळेल." उचगाव? मला उचकी लागली. "उचगाव हे एकदम जवळ (म्हणजे १५ किलोमीटर हे मला नंतर कळलं) असलेलं मोठं गाव आहे. तिथून तर अगदी ५-५ मिनिटाला मिनीबसेस मिळतील कोवाडला जायला !" धन्य ! म्हणजे अजून किती सवाऱ्या नशिबी लिहिलेल्या, देवच जाणे ! "साठ रुपये द्या. एक पैसा कमी घेणार नाही." ’अडला हरी.....’, ’गरजवंताला अक्कल.......’ अशा चौथी स्कॉलरशिप परिक्षेला घासलेल्या म्हणी आठवू लागल्या. निमुटपणे पैसे कोंबले त्याच्या हातात, आणि पुढच्या सेमीस्टरच्या अभ्यासाला लागलो.

१०:४० ! मी आजवर जन्मात कधीही लिफ्ट मागितलेली नव्हती. तशी वेळच आली नव्हती म्हणा कधी. वाहनं तर बरीच जात होती रस्त्यावरून. ट्रक, टेंपो, जीप, कार, आणि बाईकसुद्धा. पण नक्की कोणाला (आणि कसा) हात दाखवू, उमजेना. मी अनुक्रमे सगळ्यांना घाबरत घाबरत अंगठा दाखवला. पण सगळ्यांनी मला ’ठेंगा’ दाखवला ! वेळ जशीजशी वाढत होती, तसतशी माझी धडधड वाढत होती. माझी अगतिकता लक्षात येऊन कुणीतरी बाईकवाला (नव्हे.. अजून एक देवमाणूस !) माझ्यापाशी थांबला. मी दबक्या आवाजात विचारलं, "कोवाडला ड्रॉप कराल काय भाऊ?" त्याने डोळे मिचकावले, "मी तर इथंच जवळ गणेश मंदिरात जातोय." यांच्या ’जवळ’ ची व्याख्या तोपर्यंत समजली नसल्याने मी पुन्हा एक चान्स घेतला. "मग उचगावला तरी? किंवा तुम्ही जिथपर्यंत जाताय तिथपर्यंत !" तो फक्त गालात हसला, आणि बाईकवर बसायचा इशारा केला. आणि मला खरंच देव पावल्यागत झालं.

बाईक पळत होती. कुठलं अनोळखी गाव, कुठला अनोळखी रस्ता आणि कुठला अनोळखी माणूस ! जरा विचित्रच वाटत होतं सगळं. बरं हा माणूस मला कुठवर सोडणार त्याचाही अंदाज येईना. एक गणेश मंदिर दिसलं खरं. पण याने बाईक काही थांबवली नाही ! कुणीच काहीच बोलेना. मग डोक्यात चक्रं फिरायला लागली. नक्की इरादे तरी काय होते त्याचे? मला खरोखर कुठेतरी सोडतोय, की डायरेक्ट ’पोचवतोयच’ ! अचानक त्या निर्मनुष्य रस्त्यावर एक टपरीवजा दुकानापाशी त्याने बाईक थांबवली. तिथे दोन-चार हट्टे-कट्टे मर्द गप्पा छाटत होते. हा भिडू जाऊन एकदम मिठ्या वगैरे !! काहीतरी खुसफुस सुरू झाली. मी इथे लांब उभा. बुचकळ्यात !! काय करू? दुसऱ्या गाडीला हात दाखवू की नको?

२-४ मिनिटात त्यातले दोघे माझ्याजवळ आले. एकाच्या चेहऱ्यावरचे भाव संशयास्पद. "कुठं कोवाडला जायचं म्हणताय !" "हो." "कुठून आलात?" "बॅंगलोर" "चला बसा गाडीवर." पुढे माझा देवमाणूस बसला. "तुम्ही मध्ये बसा. मी मागे बसतो." ट्रिपल सीट ! आणि मी दोघांच्या मध्ये कचाट्यात ! माझा संशय आणि धडधड दोन्हीही शिगेला पोचले ! काहीच कळेना काय होईल. बहुतेक ’गेम’च होणार आज माझा !!

बाईक पुन्हा चालू. "उचगावला सोडतो तुम्हाला. तिथून मिळंल तुम्हाला काही न काही." मर्द-माणूस म्हणाला. (देवमाणसाच्या तोंडून तर अजून शब्दही फुटत नव्हता.) "तुम्ही इतक्या लांबून लग्नाला आलायत, आणि बस बंद आहेत, म्हणून गाडी वळवलीय. नाहीतर आम्ही येत पण नसतो इकडे !" मनात कृतज्ञता निर्माण व्हावी, की संशयच? काही कळेना.

कुठल्याशा खेडेगावात येऊन आमची यात्रा थांबली. हेच होतं ते सुप्रसिद्ध उचगाव ! थोड्याच पुढे एक मिनीबस थांबलेली. (संप बसचा होता तर.. मिनीबसचा नाही !) गोष्टीतल्या कोल्ह्याला द्राक्षं दिसल्यावर कसं झालं असेल, तसंच मला झालं. मर्द-माणूस लगबगीने पुढे गेला, आणि चौकश्या करून परत आला. "कोवाडला नाही जाणार ही बस !" द्राक्षं आंबटच निघाली. "पण घाबरू नका. इथे १०-१० मिनिटाला मिनीबस असतात. मिळेलच लगेच." ती द्राक्षं, आणि हे मृगजळ की काय? देवमाणूस आणि मर्द-माणूस मला जवळच एका पानाच्या स्टॉलवर घेऊन गेले. (मी पान तर खात नसतो ! आणि तंबाखूही नाही ! तरीही?) मर्द-माणसाने पानवाल्याला आर्जव केली, "हे पाव्हणं आहेत. लांबून आलंत बंगलोरहून. दुंडग्याला जायचंय लग्नाला. जरा लक्ष ठेवा. बसमध्ये बसवून द्या त्यांना." आणि दोघे बाईककडे सरसावले. मला क्षणभर भरून आलं. कृतज्ञता कशी व्यक्त करू, कळेना. "तुम्हाला काही द्यायचं का मी?" "पैशासाठी नाही आलो आम्ही इथं ! तुमचं लग्न चुकू नये, म्हणून आलो." देवमाणूस बोललाच शेवटी ! आता तर खरंच दाटून आलं मला. पैशाने मी पेट्रोलचा मोबदला देऊ शकत होतो. पण माणूसकी फेडण्याइतकी ताकद पैशात कुठे ! मी फक्त कृतज्ञतेने हात मिळवला, आणि त्यांना निरोप दिला.

११:०० ! अरे ! ट्रेनमधून उतरून एकच तास झालेला. मला तर अख्ख्या दिवसभराच्या घडामोडी झाल्यासारखं वाटलेलं ! म्हणजे अजूनही ४३ मिनिटं होती माझ्याकडे. शिवाय दुसऱ्या मिनीबसचं मृगजळही होतंच की सोबत. आता पानवाल्याची कळकळ सुरू झाली. मी कोण, कुठला, गाव कुठलं इत्यादी तोंडओळखीपासून ते ’माझा ठेचाळलेला प्रवास’ हा निबंध त्याने कुतुहलाने ऐकून घेतला. बस येईपर्यंत दुसरं कामच काय ! पण १०-१० मिनिटांना असलेली मिनीबस २० मिनिटं झाली, तरी काही दर्शन देईना. तोवर इथे पानवाल्याने आपल्या सवंगड्यांना जमवून माझी काहीतरी सोय करण्याचा खटाटोप चालवला. कोवाड तिथून १५ किलोमीटर अन दुंडगे अजून ४-५ किलोमीटर पुढे. त्यामुळे कोणीही बाईकवाला सवंगडी जायला तयार होईना. बरं, रस्त्यावरून जाणाऱ्या बाईक, ट्रॅक्स, टेंपोपैकी सगळ्यांना हात दाखवून झाला. पण पुन्हा ठेंगाच ! "मुहुर्त चुकलाच तुमचा. घाई करून कायबी फायदा नाय. आता फक्त आल्यासारखं भेटून या त्यांना." पानवाल्याने सांत्वन केलं. पण का कुणास ठाऊक, मी अजूनही त्या मृगजळाच्या आशेवर तगून होतो. अजूनही २० मिनिटं शिल्लक होती !

शेवटी त्याने कुणीतरी रिक्षावाला गाठला. (नाही ! पुन्हा रिक्षा ! काका मला वाचवा !) त्यालाही पुन्हा तीच सगळी वीरगाथा सांगितली. "तुमको इतना अर्जंट है, इस वास्ते चलनेको रेड्डी है. पर तीनसौ रुपया होएंगा." च्यायला ! एवढे पराक्रम करून इथवर आलो, तर काय याला पुन्हा तीनशे देऊ ! पृथ्वी गोल आहे !

११:३० ! ’टाईम इज मनी’ की ’मनी इज टाईम’ असा गहन विचार सुरूच झालेला, तितक्यात एक ट्रक येऊन थांबला. ही पळापळ ! "कोवाड जाओगे?" "हां!" जणू नामदेवांना (की तुकारामांना) न्यायला पुष्पक रथच अवतरला होता पृथ्वीवर ! माझा आनंद गगनात मावेनासा झाला ! (पुन्हा स्कॉलरशिप !) मी बरीच कसरत करून कसाबसा त्या ट्रकच्या केबिनमध्ये शिरलो. मागून ही ढीग जनता ! मुंबईच्या लोकल ट्रेनची कसर भरून निघाली. (लोकं कोवाडला फक्त लग्नालाच जात नसतात, तर इतर लोकांना इतर कामंही असू शकतात, याचं अद्याप भानच नव्हतं मला.)

रथ सुरू झाला. मला इतका हर्ष झालेला, की ’यूही चला चल राही’ मोठ्ठ्याने गावंसं वाटंलं. पण मी काही शाहरूख नव्हे, हे जाणवून गप्प बसलो. ट्रक राईड इतकी ’सेन्सेशनल’ होती, की त्याची सर मर्सिडीज राईडला पण आली नसती. (इतके गचके बसत होते, की कुठेकुठे सेन्सेशन होत होतं, काय सांगू !) त्यात रस्ता इतका अप्रतिम होता, की त्यावर कुठेकुठे डांबरही दिसत होतं; फक्त खड्डेच नव्हते काही ! थोडं पुढे गेल्यावर एक मोठ्ठाला बोर्ड दिसला. "महाराष्ट्रात आपले सहर्ष स्वागत आहे." हीच होती ती ऐतिहासिक महाराष्ट्र-कर्नाटक सीमा, जिची फळं पहिल्याच भेटीत मला पोटभरून (नव्हे, तोंडात कोंबून) खायला मिळालेली.

महाराष्ट्रात नुकताच प्रवेश केला, आणि रस्त्यावरील डांबर अचानक अदृष्य झालं. त्याची जागा खडी आणि मातीने घेतली. महाराष्ट्राच्या मातीतच जादू आहे म्हणतात, ते काही खोटं नाही ! आता तर फुल्ल एस्सेलवर्ल्डलाही लाजवेल, अशी राईड सुरू झाली. मी म्हणतो, एवढी सोय गावोगावी उपलब्ध असताना आपण हजार रुपये खर्च करून का जावे अम्युझमेंट पार्कमध्ये ! त्या राईडच्या धुंदीत कोवाड कधी आलं, ते ड्राईव्हरने बोंबलल्याशिवाय कळलंच नसतं.

पुन्हा कसरत आणि धक्काबुक्की करत खाली उतरलो. जवळजवळ सातवं सेमिस्टर पास झालेलो. आता दुंडगे गाव शोधणं म्हणजे व्हायवा देण्यासारखं होतं. १२ वाजलेले. घड्याळात, आणि माझेही ! मुहुर्त तर केव्हाच चुकला होता. पण अंगात एकूण किती हाडं आहेत, याची जाणिवही सगळी हाडं करून देत होती. एका दुकानात शिरलो. "दुंडगे गावाला जुवेकरांकडे लग्न ..." "हो हो हो. इथून असं खाली जा. जवळच आहे." पुन्हा ’जवळ’ ! चालतोय चालतोय, पण कुठेच लग्नाचं नामोनिशाण दिसेना. व्हायवाला भरपूर अभ्यास करूनही अतिशय खडूस एक्स्टर्नल आला, तर कसं व्हायचं, त्याची आठवण झाली.

मागून एका लूनाचा आवाज आला. देवमाणूस असो वा दानव, मी त्याला थांबवलं, आणि लिफ्ट हवीय म्हणून सरळ पाठीच बसलो. पुन्हा एक ’सुहाना सफर’ ! इथे तिथे नजर फिरवताना रस्त्यालगतच एका घराच्या अंगणात भरपूर माणसं जमलेली दिसली. एकदम फेटे वगैरे घालून. जणू थेटरमध्ये पिक्चर बघतायत, तसे एकाच दिशेत बघत ! सव्वा-बारा वाजलेले. आणि ताईचं लग्न तर ११.४३ ला लागून पण गेलं असेल. हेच का ते लग्न ? की अजून पुढच्या खेड्यात जावं ? चान्स घेऊ म्हटलं. लूनावाल्याला थांबायला लावलं, आणि टुणकन उडी मारून मी अक्षरशः धावलोच.

मंगलाष्टका सुरू होत्या. पण ओळखीचं कोणीच दिसेना. (गावच्या मंडळीचीच इतकी गर्दी होती, की माझ्या ओळखीची मंडळी काय डोंबल दिसणार !) कुण्यातरी काकांनी माझ्या हातात अक्षता दिल्या. ’शुभमंगल सावधान’ ऐकून सगळ्यांनी अक्षता टाकल्या. तशा मीही. पण अजूनही संभ्रम. लग्नाला फुकटचं जेवण हासडायला म्हणून नाही, पण चुकूनच मी चुकीच्या लग्नाला तर आलो नव्हतो? अंतर्पाट पडला आणि नवरा नवरीने एकमेकांना माळा घातल्या. पण मी सगळ्यात मागे होतो. मला नवरीही दिसेना. आता म्हटलं, की सरळ पुढेच घुसावं. जातोच, तितक्यात त्याच काकांनी खेचलं, "चला जेवायला चला. जेवायला चला. उशीर करू नका." जेवायला काय ! अजून लग्न कुठलं तेच माहीत नाही आणि यांचं काहीतरी भलतंच ! मी "आलोचं हं जरा" अशी लाडीगोडी लाऊन सटकलो आणि थेट पुढे. नवरी पाठमोरी उभी होती. मी दबकत जरा अजून पुढे जाऊन वाकून पाहिलं. मुंडावळ्यांमागून ताईचा चेहरा डोकावला. आणि माझा जीव भांड्यात पडला ! अनपेक्षितपणे (म्हणजे इंडिअन श्टॅंडर्ड टाईमानुसार अपेक्षितच !) लग्न लागायला उशीर झाल्याने अगदी शेवटच्या का होईना, माझ्या हातून अक्षता पडल्येला ! थोडक्यात काय, तर माझ्या रोमांचक प्रवासाचं सार्थक झालं. आणि माझं घोडं गंगेत न्हालं !

घोड्यावरून आठवलं. बस, ट्रेन, रिक्षा, बाईक, ट्रक आणि शेवटी लूना ! सगळ्याच भू-वाहनांची सैर झाली या निमित्ताने. एक घोड्याचीच रपेट तेवढी राहिलीय. पुन्हा आहे का हो कुणाचं लग्न खेडेगावात ?

- अनामिक
(२४-०२-२०१०)

07 मार्च 2010

सिंह तात्पर्य झाला

सिंह तात्पर्य झाला ? तुम्ही म्हणाल, "हे काय भलतंच !" अहो, पण आजकाल असलं काही भलतं-सलतं लिहिल्याशिवाय लक्षच देत नाहीत लोक.. उगाच नाही ’बलबीर पाशा’ची जाहिरात इतकी पॉप्युलर झाली होती... पण हे विधान वाटतं तितकं भलतं-सलतं नाहीये काही.. त्यामागे इतिहास आहे मोठ्‍ठा ! (उगाच हवा केल्याशिवाय कोणीच वाचणार नाही, हे ही ठाऊक आहे मला !)

तर झालं असं.. कुणे एके काळी.. फार फार वर्षांपूर्वी.. (इत्यादी वगैरे वगैरे..) आमचे चुलतबंधू विक्रम (शाळेत जातात, हाच मोठा विक्रम आहे.) चौथीच्या स्कॉलरशिप परिक्षेला बसलेले.. (बसलेला काय, आम्हीच जबरदस्तीने बसवलेला त्याला !) स्कॉलरशिप मंडळाचं अहोभाग्यच म्हणावं लागेल हे. रोज आमंत्रण-पत्रिका छापून ग्राऊंडमधून बोलावणं धाडल्याशिवाय गृहपाठालाही येत नाही.. तर स्कॉलरशिपचा अभ्यास काय डोंबल करणार ! त्याचा पेपर तपासल्यावर संगणकसुद्‍धा हॅंग झाल्याशिवाय राहिला नसता, इतकी कसून तयारी केलेली त्याने..

शेवटी स्कॉलरशिपच्या इतिहासातील तो सुवर्णदिन आला, ज्या दिवशी आमचे बंधू पेपर द्यायला गेले.. एकदम ’वेल प्रिपेअर्ड’ ! (म्हणजे अभ्यास-बिभ्यास नाही काही.. पेन-पेन्सिल-पट्‍टी-खोडरबर-पॅड वगैरे सगळी महत्वाची तयारी..) मराठीच्या सेक्शनमध्ये एक गोष्ट लिहायला येते. म्हणजे काही मुद्‍दे दिलेले असतात, आणि त्यांचा विस्तार करून गोष्ट तयार करायची असते. (बॉलीवूडवालेही जास्तीत जास्त ३ ते ४ पॉईंट्सवरून अख्खा ३ तासांचा पिक्चर बनवतात. त्याची पाळेमुळे इथेच रुजली आहेत !) तर त्यावेळी सिंह आणि उंदराची गोष्ट आलेली त्यांना.

मुद्‍दे असे होते : सिंह आणि उंदिर, उंदराचा सिंहाच्या अंगाशी खेळ, सिंहाचा राग, उंदराची याचना, मदत करण्याचे आश्वासन, उंदराची सुटका, सिंह जाळ्यात, मदतीसाठी हाक, उंदराने कुरतडलेलं जाळं, सिंहाची सुटका, तात्पर्य.

ही गोष्ट साहेबांनी चुकून आधीच कुठेतरी ऐकली होती (वाचली असणं अशक्य आहे.) (हे त्या सिंहाला कळलं असतं, तर कित्ती खुश झाला असता तो.) त्याने फाडफाड सगळी गोष्ट लिहून काढली. पण राजधानी एक्स्प्रेस दिल्लीला पोचणार, इतक्यात शेवटच्या सिग्नलपाशी येऊन घसरली. ’तात्पर्य’ या शब्दाचा अर्थच कळेना त्याला. बराच वेळ डोकं खपवूनही शेवटचं वाक्य काय लिहावं, हे सुधरेना. (आधीच वाचनाच्या नावाने शिमगा. त्यात ऐन परिक्षा.) शेवटी डोळे बंद करून त्याने अंधारात गोळी मारली. "सिंह तात्पर्य झाला" (ती गोळी लागून सिंह खरोखरच मरून पडला असेल.)

घरी येऊन मोठ्या दिमाखात बंधूंनी आपल्या पराक्रमाचं वर्णन केलं. पण माझं आणि माझ्या बहिणीचं मात्र हसून हसून पोट फुटायची पाळी आली. तेव्हापासून आम्ही दोघांनी म्हणच पाडली ही. जिवापाड मेहनत करूनही काहीच फायदा झाला नाही किंवा एखाद्या गोष्टीचा काहीच निष्कर्ष निघाला नाही, की आम्ही म्हणतो, "सिंह तात्पर्य झाला !"

ही म्हण मला घराघरापर्यंत पोचवायची आहे. अगदी मराठी शब्दकोशामध्ये नाही, तरी बोलीभाषेत तरी कुठेतरी रेंगाळली पाहिजे लोकांच्या जिभेवर. (कुठलंही चांगलं कार्य करून प्रसिद्‍धी मिळवता आली नाही, तरी कुरापती करून चर्चेत याचची खोडच असते काही लोकांना !) या म्हणीचे ’कॉपीराईट्स’ जरी माझ्याकडे आणि माझ्या बहिणीकडे असले, तरीही ’लीनक्स’ सारखं ’ओपनसोर्स पब्लिक लायसन्स’ खाली सगळ्यांना वापरता येईल. ऑफिसमध्ये आणि मित्रमंडळींमध्ये तर मी प्रचाराला सुरुवात केलीच आहे. पण आता लेख लिहून अधिक मोठा जनसमूह टारगेट करायचाय मला. (नेतेमंडळीही असाच टार्गटपणा करत असतात प्रचारासाठी !) एका मित्राशी आधीच ’साफ बंडल आहे ही म्हण’ या मुद्‍दावरून आधीच बराच तात्विक वाद झाला आहे. (भांडणाला सभ्य भाषेत ’तात्विक वाद’ म्हणतात !) पण तरीही मी ’शंभर पिक्चर आपटूनसुद्‍धा एकशे-एकावा पिक्चर करणाऱ्या अभिषेक बच्चन’सारखा अजूनही हिम्मत हरलेलो नाहीये.

माझ्या या खटाटोपाला (म्हणजे उठाठेवीला) प्रतिसाद देऊन जर आपण ही म्हण वापरायला आणि पसरवायला सुरुवात केलीत, तर मी आपल्याला (जास्त काही नाही.. फार फार तर ऑर्कुटवर एखादा स्क्रॅप करून) मनःपूर्वक धन्यवाद देईन. पण जर ’सकाळी सकाळी कुणाचं तोंड पाहिलेलं म्हणून हा दळभद्री लेख वाचावा लागला’ असं म्हणत आपण स्वतःचेच केस उपटून घेऊ लागलात, तर शेवटी मी वेगळं काय म्हणणार ! मला पुन्हा तेच म्हणावं लागेल..
"सिंह तात्पर्य झाला !"

- अनामिक
(०६-०३-२०१०)