फुलपाखरासारखी चंचल
झुळझुळ झऱ्यासारखी अवखळ
इवल्या मुलासारखी अल्लड
अन् कारंज्यागत उत्श्रृंखल
श्रावण-सरींसारखी लहरी
हवेसारखी निखळ, खेळकर
नदीसारखी स्वच्छंदी, अन्
लाटांगत बेधुंद, बेफिकिर
चिऊसारखी अथक बोलकी
मधासारखी गोड, लाजरी
सदाफुलीसारखी सदैव
टवटवीत, स्वानंदी, हसरी
गुलाबासारखी मनमोहक
मोरपिसागत मखमल, कोमल
विजेसारखी प्रखर, तळपती
अन् तारकांसारखी तेजल
चैतन्याचा पाउस रिमझिम
प्रसन्नतेचा पूर निरंतर
उत्साहाची उदंड भरती
अमर्याद ऊर्जेचा सागर
किती रंग उपमांचे भरले
अपूर्ण तरिही वाटे चित्रण
शक्य नसे शब्दांनी करणे
तिच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन
- अनामिक
(२४/०१/२०१९ - ०४/०२/२०१९)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें