
तर झालं असं.. कुणे एके काळी.. फार फार वर्षांपूर्वी.. (इत्यादी वगैरे वगैरे..) आमचे चुलतबंधू विक्रम (शाळेत जातात, हाच मोठा विक्रम आहे.) चौथीच्या स्कॉलरशिप परिक्षेला बसलेले.. (बसलेला काय, आम्हीच जबरदस्तीने बसवलेला त्याला !) स्कॉलरशिप मंडळाचं अहोभाग्यच म्हणावं लागेल हे. रोज आमंत्रण-पत्रिका छापून ग्राऊंडमधून बोलावणं धाडल्याशिवाय गृहपाठालाही येत नाही.. तर स्कॉलरशिपचा अभ्यास काय डोंबल करणार ! त्याचा पेपर तपासल्यावर संगणकसुद्धा हॅंग झाल्याशिवाय राहिला नसता, इतकी कसून तयारी केलेली त्याने..
शेवटी स्कॉलरशिपच्या इतिहासातील तो सुवर्णदिन आला, ज्या दिवशी आमचे बंधू पेपर द्यायला गेले.. एकदम ’वेल प्रिपेअर्ड’ ! (म्हणजे अभ्यास-बिभ्यास नाही काही.. पेन-पेन्सिल-पट्टी-खोडरबर-पॅड वगैरे सगळी महत्वाची तयारी..) मराठीच्या सेक्शनमध्ये एक गोष्ट लिहायला येते. म्हणजे काही मुद्दे दिलेले असतात, आणि त्यांचा विस्तार करून गोष्ट तयार करायची असते. (बॉलीवूडवालेही जास्तीत जास्त ३ ते ४ पॉईंट्सवरून अख्खा ३ तासांचा पिक्चर बनवतात. त्याची पाळेमुळे इथेच रुजली आहेत !) तर त्यावेळी सिंह आणि उंदराची गोष्ट आलेली त्यांना.
मुद्दे असे होते : सिंह आणि उंदिर, उंदराचा सिंहाच्या अंगाशी खेळ, सिंहाचा राग, उंदराची याचना, मदत करण्याचे आश्वासन, उंदराची सुटका, सिंह जाळ्यात, मदतीसाठी हाक, उंदराने कुरतडलेलं जाळं, सिंहाची सुटका, तात्पर्य.
ही गोष्ट साहेबांनी चुकून आधीच कुठेतरी ऐकली होती (वाचली असणं अशक्य आहे.) (हे त्या सिंहाला कळलं असतं, तर कित्ती खुश झाला असता तो.) त्याने फाडफाड सगळी गोष्ट लिहून काढली. पण राजधानी एक्स्प्रेस दिल्लीला पोचणार, इतक्यात शेवटच्या सिग्नलपाशी येऊन घसरली. ’तात्पर्य’ या शब्दाचा अर्थच कळेना त्याला. बराच वेळ डोकं खपवूनही शेवटचं वाक्य काय लिहावं, हे सुधरेना. (आधीच वाचनाच्या नावाने शिमगा. त्यात ऐन परिक्षा.) शेवटी डोळे बंद करून त्याने अंधारात गोळी मारली. "सिंह तात्पर्य झाला" (ती गोळी लागून सिंह खरोखरच मरून पडला असेल.)
घरी येऊन मोठ्या दिमाखात बंधूंनी आपल्या पराक्रमाचं वर्णन केलं. पण माझं आणि माझ्या बहिणीचं मात्र हसून हसून पोट फुटायची पाळी आली. तेव्हापासून आम्ही दोघांनी म्हणच पाडली ही. जिवापाड मेहनत करूनही काहीच फायदा झाला नाही किंवा एखाद्या गोष्टीचा काहीच निष्कर्ष निघाला नाही, की आम्ही म्हणतो, "सिंह तात्पर्य झाला !"
ही म्हण मला घराघरापर्यंत पोचवायची आहे. अगदी मराठी शब्दकोशामध्ये नाही, तरी बोलीभाषेत तरी कुठेतरी रेंगाळली पाहिजे लोकांच्या जिभेवर. (कुठलंही चांगलं कार्य करून प्रसिद्धी मिळवता आली नाही, तरी कुरापती करून चर्चेत याचची खोडच असते काही लोकांना !) या म्हणीचे ’कॉपीराईट्स’ जरी माझ्याकडे आणि माझ्या बहिणीकडे असले, तरीही ’लीनक्स’ सारखं ’ओपनसोर्स पब्लिक लायसन्स’ खाली सगळ्यांना वापरता येईल. ऑफिसमध्ये आणि मित्रमंडळींमध्ये तर मी प्रचाराला सुरुवात केलीच आहे. पण आता लेख लिहून अधिक मोठा जनसमूह टारगेट करायचाय मला. (नेतेमंडळीही असाच टार्गटपणा करत असतात प्रचारासाठी !) एका मित्राशी आधीच ’साफ बंडल आहे ही म्हण’ या मुद्दावरून आधीच बराच तात्विक वाद झाला आहे. (भांडणाला सभ्य भाषेत ’तात्विक वाद’ म्हणतात !) पण तरीही मी ’शंभर पिक्चर आपटूनसुद्धा एकशे-एकावा पिक्चर करणाऱ्या अभिषेक बच्चन’सारखा अजूनही हिम्मत हरलेलो नाहीये.
माझ्या या खटाटोपाला (म्हणजे उठाठेवीला) प्रतिसाद देऊन जर आपण ही म्हण वापरायला आणि पसरवायला सुरुवात केलीत, तर मी आपल्याला (जास्त काही नाही.. फार फार तर ऑर्कुटवर एखादा स्क्रॅप करून) मनःपूर्वक धन्यवाद देईन. पण जर ’सकाळी सकाळी कुणाचं तोंड पाहिलेलं म्हणून हा दळभद्री लेख वाचावा लागला’ असं म्हणत आपण स्वतःचेच केस उपटून घेऊ लागलात, तर शेवटी मी वेगळं काय म्हणणार ! मला पुन्हा तेच म्हणावं लागेल..
"सिंह तात्पर्य झाला !"
- अनामिक
(०६-०३-२०१०)
शेवटी नावात 'विक्रम' होते म्हणून असे मोठे काम घडले त्यांच्याकडून
जवाब देंहटाएंआता तुम्ही 'विक्रम तुसी ग्रेट हो ' म्हणायला हरकत नाही ;)