27 फ़रवरी 2010

मवाली

"चला चला.. लवकर लवकर चढा.. नाहीतर मागची गाडी पकडा.." कंडक्टर नेहमीप्रमाणे बोंबलत होता. मी मात्र खुश होतो.. कधी नव्हे ते बस रिकामी होती.. आणि चक्क खिडकीची जागा मिळालेली.. मस्त हवेशीर सीट..

तितक्यात एक माणूस येऊन माझ्या बाजूला बसला. माणूस कसला ! मवालीच वाटत होता तो ! कळकट्‍ट शर्ट.. तुटलेली नसून मुद्‍दामच उघडी ठेवलेली वरची ३-४ बटणं.. लाल-केशरी कलपाने रंगवलेले केस.. हेडफोनमधलं गाणं तर इतक्या जोराने वाजत होतं, की लाऊडस्पीकरवर वॉकमन चालवला असता, तरी काय बिघडलं असतं. आणि ते कमी की काय, म्हणून स्वतःला तानसेनाचा वारसदार समजून मोठ्यामोठ्याने गात पण होता. (गात कसला.. रेकत होता म्हणा.) ’लता मंगेशकर’चा आवाज ऐकून जशी ’गानकोकिला’ या शब्दाची व्याख्या न समजावता कळावी, तसं तो म्हणजे ’छपरी’ या शब्दाची व्याख्या होता. मला तर एकदम किळस आली.. माझ्या ’मस्त हवेशीर सीट’मधली पार हवाच निघून गेली.

"टिकिट.. टिकिट.." कंडक्टर वर्गणी मागण्याच्या आवेशात. मी आधीच काढलेले. कानात (म्हणजे सगळीकडेच) गाणं वाजत असल्याने त्या ’ध्याना’चं ध्यान अजूनही कुठेतरी भलतीकडेच होतं. कंडक्टरनं डोळे वटारल्यावर कुठे त्याचं लक्ष गेलं.

"दादरला जाईल ना बस?" एकदम टपोरी स्टाईल. "हा. जायेगा." कंडक्टरची पण गुर्मी कमी नव्हती. "किती रुपये तिकीट?" "दस रुपया होयेगा." "शंभर आहेत. सुट्‍टे देता काय?" "एक पैसा छुट्‍टा नही है. छुट्‍टा निकालो."

"अहो कंडक्टर, मी मगासपासून मराठीतनं विचारतोय. आणि तुम्ही हिंदीतनं काय उत्तरं देताय? मला हिंदी येत नाही असं नाही. पण हा महाराष्ट्र आहे. तुम्ही मराठी असून काय फायदा तुमचा !"

आतापर्यंतचा त्याच्याबद्‍दलच्या तिटकारा आणि किळसाची जागा नकळत आदराने घेतली. मनात विचार डोकावला, "त्याच्यासारख्या मवाल्याला पण जे कळलं, ते तुम्हा आम्हा सुशिक्षित मराठ्यांना कधी कळणार !"

(सत्यघटनेवर आधारित.. नव्हे सत्यघटनाच)

- अनामिक
(२६-०२-२०१०)

1 टिप्पणी: