25 फ़रवरी 2010

नशीब

एक तास झाला तरी ही खटारी बस जागची हलत नाही म्हणजे काय ! एक तर पाच वाजताची ट्रेन आहे बेळगावहून. आणि चार वाजले तरी इथे आडगावात ही बस सोडतच नाही भिकारडा ड्राईव्हर !

साला! सकाळपासून दिवसच खराब होता माझा. इथे बेळगावापासून अजून आत कोपऱ्यात कुठल्याशा खेडेगावात लग्नाला निघालो होतो काल बॅंगलोरहून. ट्रेनपर्यंत तर ठीक.. पण सकाळी बेळगावला पोचून कळलं की बसचा संप होता. कित्ती तारांबळ झाली माझी इथवर पोचताना सांगू! कित्ती कित्ती वाहनं बदलावी लागली.. सुरुवातीला त्या माजोरड्या रिक्षावाल्यांनी लुटलं... मग बाईक काय.. ट्रक काय.. लुना काय.. किती ती दिव्य इथवर पोचायला ! डोक्याचं खोबरं झालं पार !

बरं लग्न आटपून परत जायला निघालो, तर काही साधनही मिळेना बेळगावला पोचायला. एक तासाने कुठे ही मिनीबस आलेली, तर ती पण अजून एक तास तिथेच उभी ! आता हिला उशीर झाला, तर ट्रेन चुकलीच समजा ! मग बसतो बोंबलत ! छ्या.. नशिबच वाईट आहे माझं !

तितक्यात एक हडकुळासा माणूस कुबड्या घेऊन अडखळत अडखळत बसमध्ये चढला. एक पाय नव्हता बिचाऱ्याचा गुडघ्याखालून. कसाबसा धडपडत कुठेतरी जागा शोधून बसला तो.. चेहऱ्यावरचे भाव अतिशय कोरडे. डोळे मात्र खोल कुठेतरी पाणी तरंगत होतं.

समोरच्या सीटवरच्या माणसानं आश्चर्यानं विचारलं, "काय रं पांडू? ह्यं असं कसं काय झालं ?" पांडूच्या तोंडून शब्द फुटेना. कंठ दाटून आला असणार त्याचा. "काय सांगू रंगा. मला ही डायबिटिसची बिमारी. त्यात घरचा मी एकला कमवता. रोज शेतावर दिसरात मजुरी करनारा. दोन हप्त्यांपूर्वी शेतात पायाला गंजका सुरा लागून लय जखम झाली. रक्त थांबंना. डाक्टरकडे गेलो, तर म्हनं चांगल्या हास्पिटलात भरती व्हायला पायजेल." "मग झालास नाय काय भरती?" "आरं, हितं दोन टायमाच्या जेवनाचं वांदं.. आनि हास्पिटलाचं पैसं कुठनं आनलं असतं? म्हनलं तसंच होईल बरं. पन जखम काय भरंना. मग एक दिस सुद्‍धच गेली. जाग आली तवा बघला तर एक पायच नाय ! डाक्टर बोलले, की टायमाला आलो असतो हास्पिटलात, तर पाय वाचला असता."

पांडूचा केविलवाणा चेहरा बघवेना. "दोन पोरी हायत. त्यांची शाळा! मग लगीन! आईस पडलीय रोगात. आणि देवानं आसं बसवलाय मला ! कसं करू मी तुच सांग ना रं रंग्या !" रंगा अवाक ! उत्तरच नव्हतं त्याच्याकडं. एकच वाक्य त्याच्या तोंडून फुटलं, "सगळं नशिबाचं भोग हायत पांडू !"

अचानक एक प्रश्न छळू लागला ! बारीक-सारीक गोष्टीत सतत कुरबुर करत नशिबाला दोष देणाऱ्या आपलं नशीब खरंच इतकं वाईट आहे का ?

-अनामिक
(२४-०२-२०१०)

3 टिप्‍पणियां: