24 मार्च 2010

(बेळ)गावाकडलं लगीन

(ही कथा एका सत्यघटनेवर आधारित आहे. तेव्हा यातील घडामोडी हा केवळ योगायोग नसून खरोखरचे भोग आहेत, हे वाचकांनी लक्षात घ्यावे. काही वर्णन अगदी किंचितसं अतिशयोक्त असेलही. पण त्यामागील उद्देश हा केवळ विनोदनिर्मिती असून कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही.)

आजकाल लग्न म्हटलं, की सगळ्यांचे कान टवकारतात. छे हो ! उगाच विचारपूस करू नका. माझं नाहीये इतक्यात.. माझ्या मित्राच्या ताईचं लग्न होतं परवा. ते पण पुण्या-मुंबईतल्या कुठल्याही सामान्य हॉलमध्ये नाही ! तर ऐतिहासिक महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरच्या ज्वलंत अशा बेळगावानजिकच्या कुठल्याशा खेडेगावात. मित्र अगदीच खास असल्याने न जाण्याचा प्रश्न तर नव्हताच, पण ’कुठल्या आडगावात ठेवलंय लग्न !’ अशी कुत्सित भावनाही मुळीच नव्हती.

सन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी. तशी ताईच्या लग्नाला ’तत्काळ’ तिकिटापासून माझी तयारी. ’बॅंगलोर ते बेळगाव’ ट्रेनचं तिकीट ! रोज ऑफिसला जायलाही दहाच्या आधी न उठणारा मी, तत्काळ तिकिटासाठी मात्र बरोब्बर आठच्या आधी उठतो. घरच्या नेटचा ऑर्कुटिंग आणि चॅटिंग सोडूनही काही उपयोग असतो, याची जाणिव मला अशा प्रसंगीच होते.

लग्नाला निघायचा दिवस आला. रात्री सव्वा नऊ ची ट्रेन असल्याने ऑफिसमधून लवकर निघणं भाग होतं. साडे-सातच्या आधी ऑफिसातून निघणे, हा आमच्या टीममध्ये (अलिखित) गुन्हा समजला जातो. आणि मी तर चक्क सहा वाजताच निघण्याचा मनुष्यवधासमान अपराध करत होतो. लोकांच्या नजरा चुकवत मी गुपचुप बाहेर पडत होतोच; तितक्यात शेजारच्या टीममधल्या एका मित्राने खवचटपणे हटकलंच. "इतरांना वेळेचं तत्त्वज्ञान शिकवणारे आज स्वतः इतक्या लवकर कसे !!" अशा प्रसंगी माणसाने सरळ निर्लज्ज व्हावं आणि काढता पाय घ्यावा.

माझ्या बाईकचा (आणि इतर वाहनचालकांचा) छळ करत मी घरी पोचलो. इस्त्री करणे, डबा भरणे, बूट पॉलिश करणे (म्हणजे साधी बुटावरची धूळ झटकणे हो.) अशी अतिकष्टाची कामं आवरुन मी बॅग भरली आणि लगबगीने बसस्टॉपकडे निघालो. बॅंगलोरच्या रिक्शावाल्यांशी माझे शिवसेना-कॉंग्रेस इतके घनिष्ठ संबंध असल्यामुळे मी बी.एम.टी.सी. बसलाच वोट दिले. माझे घर ते रेल्वेस्टेशन हे १० किलोमीटर इतकं प्रचंढ लांबलचक अंतर, पाऱ्यापेक्षा जास्त घनतेच्या ट्रॅफिकमधून फक्त ४५ मिनिटांमधे पादाक्रांत करणाऱ्या ड्राईव्हरचं मला अतिशय कौतुक वाटलं. पुष्पगुच्छ आणि शाल वगैरे विकत आणून ड्राईवरचा सत्कार करण्याइतका वेळ नसल्यामुळे मी स्टेशनकडे चलुक पडलो.

मुंबईला जाणारी ट्रेन ही प्लॅटफॉर्म १ वरून सुटते. पण बेळगाववाली ही ट्रेन प्लॅटफॉर्म ८ वर लागलेली. तंगडतोड करत मी तिथवर पोचलो. ट्रेनचं नाव ’राणी चेन्नम्मा एस्प्रेस’ !! या नावावरून मला ’चिन्नम्मा चिलकम्मा चुडु चुडु चुडु’ या अतिशय श्रवणीय गाण्याची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. या गाण्यातील एकाही ओळीचा (तमिळ नाही ! हिंदीच !!) अर्थ जर कोणी मला सांगू शकला, तर त्याची गिनीज बुकात शिफारस करण्यासाठी मी हवी ती खटपट करायला (एका पायावर) तयार आहे.

कंपार्टमेंटमध्ये शिरलो, तर कधी चुकून समोरच्या सीटवर एखादी गोड पोरगी असावी, तिच्याशी चार गुलूगुलू गप्पा व्हाव्यात, असं माझ्या स्वप्नातही कधी घडत नाही हो !! माझ्या कंपार्टमेंटमध्ये यावेळीही काकवा, आज्ज्या आणि बापयेच !! काय बोलणार कोणाशी ! अशा बिकट प्रसंगी ’हॅरी पॉटर’च माझ्या साथीला धावून आला.

'हॅरी पॉटर'चा मी जबरदस्त फॅन आहे. बी.ई. फर्स्ट ईयरला असताना बाकीचे मित्र काही ना काही वाचन करत आहेत (गैरसमज करून घेऊ नका, इंजीनिअरिंगच्या पुस्तकांचं वाचन ’प्रिपेरेशन लीव्ह’शिवाय कोणीच करत नसतं !!) हे पाहून शरमेने आपणही काहीतरी वाचलं पाहिजे, म्हणून हॅरी पॉटर वाचायला मी सुरुवात केली. हळूहळू इतका इंटरेस्टिंग वाटू लागला हॅरी, की रोज सकाळ-संध्याकाळ बसमधे तब्बल २०-२० मिनिटे मी हॅरी पॉटर वाचण्याशिवाय काहीच करत नसे. अशा प्रकारे फक्त एका वर्षात एक असे ६ एपिसोड्स वाचून पण झालेत माझे.. ते पण २,१,४(अर्धा),३,४(उर्वरित),५,६ अशा मॅजिकल सिक्वेंस मध्ये !! सातवा एपिसोड तर मला इतका आवडलाय, की २ वर्षं झाली, अजुनही हातून सोडवत नाही. वर्षातून दोन-तीनदा जेव्हा बॅंगलोरहून घरी मुंबईला जातो, तेव्हा ट्रेनच्या प्रवासात गाणी ऐकून ऐकून मोबाईलची बॅटरी उतरली, आणि कुठेही चार्जिंग पॉईंट रिकामा मिळाला नाही, की मी लगेचच वाचन चालू करतो. २ वर्षात चक्क २०० पाने संपवलीयत मी.

बुकमार्क होता, म्हणून बरं. नाहीतर मागल्यावेळी कुठवर सोडलेलं, हे मला अख्खं पुस्तक एका दमात वाचून पण आठवलं नसतं. १० पानं वाचून नाही झाली, तेव्हाच माझे डोळे इतके पेंगायला लागले, की चिमटे लावूनही उघडे राहिले नसते. शेवटी मनावर दगड ठेवून मी पुस्तक बंद केलं. यावेळीही हॅरी पॉटरच कामी येणार होता. कसा ? अहो उशी नव्हती ना घेतली मी सोबत ! उगाच का हे लोक इतकी जाडजुड पुस्तकं छापतात !

सकाळी साडेआठला बेळगाव येणार होतं. आणि चिंतेची गोष्ट म्हणजे ते शेवटचे स्टेशन नव्हतं. त्यामुळे ’मला वेळीच जाग नाही आली तर’ या कल्पनाविस्तारात अख्खी रात्र निघून गेली. पण झोप काही लागली नाही. शेवटी साडेसातला फिजिकली उठून बसलो. बाहेर कुठलंसं स्टेशन आलेलं. टाईमटेबल पाहिलं, तर फक्त दोनच तास उशिरा होती ट्रेन. इतकी जलदगती इंडिअन रेल्वेसाठी बरी नव्हे ! शेवटी ८ वाजता टाईमटेबलवर येणारं बेळगाव १० वाजता रुळांवर आलं, आणि त्या पुण्यनगरीत माझं पाऊल पडलं.

लग्न होतं ११.४३ चं. (नशीब ! सेकंद छापत नाहीत मुहुर्तात !) ताईने पत्ता तर व्यवस्थित सांगितलेला. स्टेशनवरून रिक्शा करून बसस्टॅंडवर यायचं. तिथून चिक्कार बसेस जातात म्हणे लग्नगावी. बाहेर रिक्षावाल्यांची बरीच गर्दी होती. भाजी मार्केटमध्ये भाव विचारतात, तसा मी एकेका रिक्षावाल्याला बसस्टॅंडपर्यंतचा भाव विचारू लागलो. २-३ किलोमीटर अंतरासाठी ५० ते १०० मधले सगळे अंक ऐकून झाले माझे. पण कोणतीही भाजी.. आपलं रिक्षा पटेना !

आणि अचानक केवळ ३० रुपये भाव सांगणारा एक रिक्षावाला (नव्हे, देवमाणूसच म्हणावा लागेल) भेटला. अधिक विलंब केला, तर ही (ऑलमोस्ट) ’फ्री सीट’ गमावून शेवटी ’पेड सीट’च घ्यावी लागेल हे जाणून मी त्या रिक्षात ऍडमिशन घेतलं. (उगाचच इंजिनीअरींग ऍडमिशनची आठवण !) इकडच्या तिकडच्या बेळगावातल्या मराठी-कन्नड टक्केवारीच्या गप्पा करत त्याने मला बसस्टॅंडपाशी सोडलं. आणि मला फर्स्ट सेमीस्टर पास झाल्याचा आनंद झाला !

बसस्टॅंडमध्ये बघतो तर काय ! जणू काही माझ्याच स्वागतासाठी अख्खा बसस्टॅंड रिकामा करण्यात आला होता. एकही बस दिसेना. २-३ ड्राईवर-कंडक्टर सदृष्य मंडळी दिसली. मी लगेच सरसावलो. माझ्या पुढ्यात एक मोठ्ठा गहन प्रश्न पडला. यांच्याशी बोलू तरी कोणत्या भाषेत? मराठी, हिंदी की कन्नड ? कन्नडशी अद्याप सलगी झालेली नसली, तरीही एक मास्टर वाक्य शिकून ठेवलं आहे, जे हमखास सगळीकडे चालतं. ’कन्नडा गोथ्थिल्ला’. म्हणजे ’मला कन्नड येत नाही’. तरीही बेळगावात मराठी लोकांचं प्राधान्य आहे, अशा समजुतीने मी मराठीतच सुरू केलं, "कोवाड-दुंडगेला बस कुठून मिळेल?" (गावाचे नाव कित्ती मधुर आणि अनोखं आहे नाही !) तर त्या माणसाने लिंब चावल्यासारखं तोंड केलं, आणि अर्धमराठी-अर्धहिंदीमधून उत्तर चालू केलं. (त्यापेक्षा अर्धमागधीमधून सांगितलं असतं, तरी बरं झालं असतं !) त्याच्या म्हणण्याचं तात्पर्य होतं, की "आज बेळगावात बसचा संप आहे !" का? तर म्हणे मराठी-कन्नड भाषिक प्रांतीय वादामुळे बस बंद !! इतकी वर्षे आम्ही फक्त घरी बसून जांभया देत थंड डोक्याने ’ज्वलंत सीमा प्रश्ना’च्या बातम्या ऐकत आलोय. पण कर्म-धर्म-संयोगाने आज त्याच आगीने मला ग्रासलं होतं. डोक्यात मोठी घंटा वाजली, की आतापर्यंत केला, तो प्रवास नाहीच ! खरा प्रवास तर आता सुरु होणार आहे !!

स्टॅंडमधून बाहेर आलो. पाण्यात गळ टाकून बसलेल्या कोळ्यांना चार-पाच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर एक छोटा मासा दिसावा, तसा मला कावराबावरा बघून भरपूर रिक्षाचालकांनी वेढा घातला. क्षणैक मला सेलेब्रिटी असल्यासारखं भासलं. सगळ्यांनी एकत्रच ’कुठे जायचंय’ ची सरबत्ती सुरू केली. मी पुन्हा त्या गावाचं अनोखं नाव जाहीर केलं. आयताच बकरा गावलाय, पाहून एकाने सुरी चालवली, "तीनसौ रुपया होगा."

तीनशे !!! मल भुकंपाचा सूक्ष्म धक्का जाणवला. बॅंगलोर ते बेळगाव या ६०० किलोमीटरचे मी २७५ रुपये मोजलेले. आणि हा ३० किलोमीटरचे ३०० म्हणे !! मी विधानसभेतून वॉक-आऊट करू लागलो. तसा सगळा लवाजमा माझ्या मागून. घड्याळ पाहिलं. वाजलेत १०:२०.. आणि मुहुर्त ११:४३.. (बहुत नाइन्साफी है सांबा !) आणि पुढचा प्रवास अंधारात ! माझी अवस्था खरोखर कचाट्यात सापडलेल्या माशागत झालेली. कुठल्यातरी जाळ्यात गुंतावंच लागणार होतं मला. त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे कुठल्या जाळ्यात पडायचं, हा ऑप्शन माझ्याकडे होता. (नको तिथे ऑप्टिमिस्म !)

त्याच्यातल्या एका भल्या (?) आणि मराठी (पुन्हा ?) वाटणाऱ्या कोळ्याकडे.. आपलं.. रिक्षावाल्याकडे सरसावलो. त्याने मला एक निराळाच उपाय सांगितला. म्हणे, की मला एका अमक्या-तमक्या नाक्यावर सोडतो. (नाव पुन्हा अनोखं होतं. पण लक्षात नाही राहिलं.) तिथून मला कोवाडला जाण्यासाठी २०० टक्के ५० प्रकारची वाहनं मिळतील. मी शरणागती पत्करली. वेळ कुठे होता डोकं लढवायला !

उमेदवार मतं मागायला पण जात नसतील, असल्या गल्लीबोळातून आमची सफारी जात होती. काय करणार ! लवकरात लवकर पोचव अशी ताकीदच दिलेली रिक्षावाल्याला. (म्हणजे विनंती केलेली, असं म्हणायचं होतं मला.) १०-१५ मिनिटात त्याने गावाबाहेरच्या कुठल्याशा सुनसान नाक्यावर आणून रिक्षा थांबवली. आणि म्हणे, "इथून भरपूर टेंपो नाहीतर कार नाहीतर बाईकवाले जातात उचगावला. कोणालाही हात दाखवा. लगेच लिफ्ट मिळेल." उचगाव? मला उचकी लागली. "उचगाव हे एकदम जवळ (म्हणजे १५ किलोमीटर हे मला नंतर कळलं) असलेलं मोठं गाव आहे. तिथून तर अगदी ५-५ मिनिटाला मिनीबसेस मिळतील कोवाडला जायला !" धन्य ! म्हणजे अजून किती सवाऱ्या नशिबी लिहिलेल्या, देवच जाणे ! "साठ रुपये द्या. एक पैसा कमी घेणार नाही." ’अडला हरी.....’, ’गरजवंताला अक्कल.......’ अशा चौथी स्कॉलरशिप परिक्षेला घासलेल्या म्हणी आठवू लागल्या. निमुटपणे पैसे कोंबले त्याच्या हातात, आणि पुढच्या सेमीस्टरच्या अभ्यासाला लागलो.

१०:४० ! मी आजवर जन्मात कधीही लिफ्ट मागितलेली नव्हती. तशी वेळच आली नव्हती म्हणा कधी. वाहनं तर बरीच जात होती रस्त्यावरून. ट्रक, टेंपो, जीप, कार, आणि बाईकसुद्धा. पण नक्की कोणाला (आणि कसा) हात दाखवू, उमजेना. मी अनुक्रमे सगळ्यांना घाबरत घाबरत अंगठा दाखवला. पण सगळ्यांनी मला ’ठेंगा’ दाखवला ! वेळ जशीजशी वाढत होती, तसतशी माझी धडधड वाढत होती. माझी अगतिकता लक्षात येऊन कुणीतरी बाईकवाला (नव्हे.. अजून एक देवमाणूस !) माझ्यापाशी थांबला. मी दबक्या आवाजात विचारलं, "कोवाडला ड्रॉप कराल काय भाऊ?" त्याने डोळे मिचकावले, "मी तर इथंच जवळ गणेश मंदिरात जातोय." यांच्या ’जवळ’ ची व्याख्या तोपर्यंत समजली नसल्याने मी पुन्हा एक चान्स घेतला. "मग उचगावला तरी? किंवा तुम्ही जिथपर्यंत जाताय तिथपर्यंत !" तो फक्त गालात हसला, आणि बाईकवर बसायचा इशारा केला. आणि मला खरंच देव पावल्यागत झालं.

बाईक पळत होती. कुठलं अनोळखी गाव, कुठला अनोळखी रस्ता आणि कुठला अनोळखी माणूस ! जरा विचित्रच वाटत होतं सगळं. बरं हा माणूस मला कुठवर सोडणार त्याचाही अंदाज येईना. एक गणेश मंदिर दिसलं खरं. पण याने बाईक काही थांबवली नाही ! कुणीच काहीच बोलेना. मग डोक्यात चक्रं फिरायला लागली. नक्की इरादे तरी काय होते त्याचे? मला खरोखर कुठेतरी सोडतोय, की डायरेक्ट ’पोचवतोयच’ ! अचानक त्या निर्मनुष्य रस्त्यावर एक टपरीवजा दुकानापाशी त्याने बाईक थांबवली. तिथे दोन-चार हट्टे-कट्टे मर्द गप्पा छाटत होते. हा भिडू जाऊन एकदम मिठ्या वगैरे !! काहीतरी खुसफुस सुरू झाली. मी इथे लांब उभा. बुचकळ्यात !! काय करू? दुसऱ्या गाडीला हात दाखवू की नको?

२-४ मिनिटात त्यातले दोघे माझ्याजवळ आले. एकाच्या चेहऱ्यावरचे भाव संशयास्पद. "कुठं कोवाडला जायचं म्हणताय !" "हो." "कुठून आलात?" "बॅंगलोर" "चला बसा गाडीवर." पुढे माझा देवमाणूस बसला. "तुम्ही मध्ये बसा. मी मागे बसतो." ट्रिपल सीट ! आणि मी दोघांच्या मध्ये कचाट्यात ! माझा संशय आणि धडधड दोन्हीही शिगेला पोचले ! काहीच कळेना काय होईल. बहुतेक ’गेम’च होणार आज माझा !!

बाईक पुन्हा चालू. "उचगावला सोडतो तुम्हाला. तिथून मिळंल तुम्हाला काही न काही." मर्द-माणूस म्हणाला. (देवमाणसाच्या तोंडून तर अजून शब्दही फुटत नव्हता.) "तुम्ही इतक्या लांबून लग्नाला आलायत, आणि बस बंद आहेत, म्हणून गाडी वळवलीय. नाहीतर आम्ही येत पण नसतो इकडे !" मनात कृतज्ञता निर्माण व्हावी, की संशयच? काही कळेना.

कुठल्याशा खेडेगावात येऊन आमची यात्रा थांबली. हेच होतं ते सुप्रसिद्ध उचगाव ! थोड्याच पुढे एक मिनीबस थांबलेली. (संप बसचा होता तर.. मिनीबसचा नाही !) गोष्टीतल्या कोल्ह्याला द्राक्षं दिसल्यावर कसं झालं असेल, तसंच मला झालं. मर्द-माणूस लगबगीने पुढे गेला, आणि चौकश्या करून परत आला. "कोवाडला नाही जाणार ही बस !" द्राक्षं आंबटच निघाली. "पण घाबरू नका. इथे १०-१० मिनिटाला मिनीबस असतात. मिळेलच लगेच." ती द्राक्षं, आणि हे मृगजळ की काय? देवमाणूस आणि मर्द-माणूस मला जवळच एका पानाच्या स्टॉलवर घेऊन गेले. (मी पान तर खात नसतो ! आणि तंबाखूही नाही ! तरीही?) मर्द-माणसाने पानवाल्याला आर्जव केली, "हे पाव्हणं आहेत. लांबून आलंत बंगलोरहून. दुंडग्याला जायचंय लग्नाला. जरा लक्ष ठेवा. बसमध्ये बसवून द्या त्यांना." आणि दोघे बाईककडे सरसावले. मला क्षणभर भरून आलं. कृतज्ञता कशी व्यक्त करू, कळेना. "तुम्हाला काही द्यायचं का मी?" "पैशासाठी नाही आलो आम्ही इथं ! तुमचं लग्न चुकू नये, म्हणून आलो." देवमाणूस बोललाच शेवटी ! आता तर खरंच दाटून आलं मला. पैशाने मी पेट्रोलचा मोबदला देऊ शकत होतो. पण माणूसकी फेडण्याइतकी ताकद पैशात कुठे ! मी फक्त कृतज्ञतेने हात मिळवला, आणि त्यांना निरोप दिला.

११:०० ! अरे ! ट्रेनमधून उतरून एकच तास झालेला. मला तर अख्ख्या दिवसभराच्या घडामोडी झाल्यासारखं वाटलेलं ! म्हणजे अजूनही ४३ मिनिटं होती माझ्याकडे. शिवाय दुसऱ्या मिनीबसचं मृगजळही होतंच की सोबत. आता पानवाल्याची कळकळ सुरू झाली. मी कोण, कुठला, गाव कुठलं इत्यादी तोंडओळखीपासून ते ’माझा ठेचाळलेला प्रवास’ हा निबंध त्याने कुतुहलाने ऐकून घेतला. बस येईपर्यंत दुसरं कामच काय ! पण १०-१० मिनिटांना असलेली मिनीबस २० मिनिटं झाली, तरी काही दर्शन देईना. तोवर इथे पानवाल्याने आपल्या सवंगड्यांना जमवून माझी काहीतरी सोय करण्याचा खटाटोप चालवला. कोवाड तिथून १५ किलोमीटर अन दुंडगे अजून ४-५ किलोमीटर पुढे. त्यामुळे कोणीही बाईकवाला सवंगडी जायला तयार होईना. बरं, रस्त्यावरून जाणाऱ्या बाईक, ट्रॅक्स, टेंपोपैकी सगळ्यांना हात दाखवून झाला. पण पुन्हा ठेंगाच ! "मुहुर्त चुकलाच तुमचा. घाई करून कायबी फायदा नाय. आता फक्त आल्यासारखं भेटून या त्यांना." पानवाल्याने सांत्वन केलं. पण का कुणास ठाऊक, मी अजूनही त्या मृगजळाच्या आशेवर तगून होतो. अजूनही २० मिनिटं शिल्लक होती !

शेवटी त्याने कुणीतरी रिक्षावाला गाठला. (नाही ! पुन्हा रिक्षा ! काका मला वाचवा !) त्यालाही पुन्हा तीच सगळी वीरगाथा सांगितली. "तुमको इतना अर्जंट है, इस वास्ते चलनेको रेड्डी है. पर तीनसौ रुपया होएंगा." च्यायला ! एवढे पराक्रम करून इथवर आलो, तर काय याला पुन्हा तीनशे देऊ ! पृथ्वी गोल आहे !

११:३० ! ’टाईम इज मनी’ की ’मनी इज टाईम’ असा गहन विचार सुरूच झालेला, तितक्यात एक ट्रक येऊन थांबला. ही पळापळ ! "कोवाड जाओगे?" "हां!" जणू नामदेवांना (की तुकारामांना) न्यायला पुष्पक रथच अवतरला होता पृथ्वीवर ! माझा आनंद गगनात मावेनासा झाला ! (पुन्हा स्कॉलरशिप !) मी बरीच कसरत करून कसाबसा त्या ट्रकच्या केबिनमध्ये शिरलो. मागून ही ढीग जनता ! मुंबईच्या लोकल ट्रेनची कसर भरून निघाली. (लोकं कोवाडला फक्त लग्नालाच जात नसतात, तर इतर लोकांना इतर कामंही असू शकतात, याचं अद्याप भानच नव्हतं मला.)

रथ सुरू झाला. मला इतका हर्ष झालेला, की ’यूही चला चल राही’ मोठ्ठ्याने गावंसं वाटंलं. पण मी काही शाहरूख नव्हे, हे जाणवून गप्प बसलो. ट्रक राईड इतकी ’सेन्सेशनल’ होती, की त्याची सर मर्सिडीज राईडला पण आली नसती. (इतके गचके बसत होते, की कुठेकुठे सेन्सेशन होत होतं, काय सांगू !) त्यात रस्ता इतका अप्रतिम होता, की त्यावर कुठेकुठे डांबरही दिसत होतं; फक्त खड्डेच नव्हते काही ! थोडं पुढे गेल्यावर एक मोठ्ठाला बोर्ड दिसला. "महाराष्ट्रात आपले सहर्ष स्वागत आहे." हीच होती ती ऐतिहासिक महाराष्ट्र-कर्नाटक सीमा, जिची फळं पहिल्याच भेटीत मला पोटभरून (नव्हे, तोंडात कोंबून) खायला मिळालेली.

महाराष्ट्रात नुकताच प्रवेश केला, आणि रस्त्यावरील डांबर अचानक अदृष्य झालं. त्याची जागा खडी आणि मातीने घेतली. महाराष्ट्राच्या मातीतच जादू आहे म्हणतात, ते काही खोटं नाही ! आता तर फुल्ल एस्सेलवर्ल्डलाही लाजवेल, अशी राईड सुरू झाली. मी म्हणतो, एवढी सोय गावोगावी उपलब्ध असताना आपण हजार रुपये खर्च करून का जावे अम्युझमेंट पार्कमध्ये ! त्या राईडच्या धुंदीत कोवाड कधी आलं, ते ड्राईव्हरने बोंबलल्याशिवाय कळलंच नसतं.

पुन्हा कसरत आणि धक्काबुक्की करत खाली उतरलो. जवळजवळ सातवं सेमिस्टर पास झालेलो. आता दुंडगे गाव शोधणं म्हणजे व्हायवा देण्यासारखं होतं. १२ वाजलेले. घड्याळात, आणि माझेही ! मुहुर्त तर केव्हाच चुकला होता. पण अंगात एकूण किती हाडं आहेत, याची जाणिवही सगळी हाडं करून देत होती. एका दुकानात शिरलो. "दुंडगे गावाला जुवेकरांकडे लग्न ..." "हो हो हो. इथून असं खाली जा. जवळच आहे." पुन्हा ’जवळ’ ! चालतोय चालतोय, पण कुठेच लग्नाचं नामोनिशाण दिसेना. व्हायवाला भरपूर अभ्यास करूनही अतिशय खडूस एक्स्टर्नल आला, तर कसं व्हायचं, त्याची आठवण झाली.

मागून एका लूनाचा आवाज आला. देवमाणूस असो वा दानव, मी त्याला थांबवलं, आणि लिफ्ट हवीय म्हणून सरळ पाठीच बसलो. पुन्हा एक ’सुहाना सफर’ ! इथे तिथे नजर फिरवताना रस्त्यालगतच एका घराच्या अंगणात भरपूर माणसं जमलेली दिसली. एकदम फेटे वगैरे घालून. जणू थेटरमध्ये पिक्चर बघतायत, तसे एकाच दिशेत बघत ! सव्वा-बारा वाजलेले. आणि ताईचं लग्न तर ११.४३ ला लागून पण गेलं असेल. हेच का ते लग्न ? की अजून पुढच्या खेड्यात जावं ? चान्स घेऊ म्हटलं. लूनावाल्याला थांबायला लावलं, आणि टुणकन उडी मारून मी अक्षरशः धावलोच.

मंगलाष्टका सुरू होत्या. पण ओळखीचं कोणीच दिसेना. (गावच्या मंडळीचीच इतकी गर्दी होती, की माझ्या ओळखीची मंडळी काय डोंबल दिसणार !) कुण्यातरी काकांनी माझ्या हातात अक्षता दिल्या. ’शुभमंगल सावधान’ ऐकून सगळ्यांनी अक्षता टाकल्या. तशा मीही. पण अजूनही संभ्रम. लग्नाला फुकटचं जेवण हासडायला म्हणून नाही, पण चुकूनच मी चुकीच्या लग्नाला तर आलो नव्हतो? अंतर्पाट पडला आणि नवरा नवरीने एकमेकांना माळा घातल्या. पण मी सगळ्यात मागे होतो. मला नवरीही दिसेना. आता म्हटलं, की सरळ पुढेच घुसावं. जातोच, तितक्यात त्याच काकांनी खेचलं, "चला जेवायला चला. जेवायला चला. उशीर करू नका." जेवायला काय ! अजून लग्न कुठलं तेच माहीत नाही आणि यांचं काहीतरी भलतंच ! मी "आलोचं हं जरा" अशी लाडीगोडी लाऊन सटकलो आणि थेट पुढे. नवरी पाठमोरी उभी होती. मी दबकत जरा अजून पुढे जाऊन वाकून पाहिलं. मुंडावळ्यांमागून ताईचा चेहरा डोकावला. आणि माझा जीव भांड्यात पडला ! अनपेक्षितपणे (म्हणजे इंडिअन श्टॅंडर्ड टाईमानुसार अपेक्षितच !) लग्न लागायला उशीर झाल्याने अगदी शेवटच्या का होईना, माझ्या हातून अक्षता पडल्येला ! थोडक्यात काय, तर माझ्या रोमांचक प्रवासाचं सार्थक झालं. आणि माझं घोडं गंगेत न्हालं !

घोड्यावरून आठवलं. बस, ट्रेन, रिक्षा, बाईक, ट्रक आणि शेवटी लूना ! सगळ्याच भू-वाहनांची सैर झाली या निमित्ताने. एक घोड्याचीच रपेट तेवढी राहिलीय. पुन्हा आहे का हो कुणाचं लग्न खेडेगावात ?

- अनामिक
(२४-०२-२०१०)

6 टिप्‍पणियां:

  1. are yaaaaaar he kharacha mast ahe maza pot dukhala hasun hasun

    जवाब देंहटाएं
  2. बाऽऽऽपरे.. एवढा मोठा लेख! पण झकास आहे एकदम. हसून हसून पुरेवाट झाली आमची राव... मस्तच! ड्यूड, यू रॉक :-)

    जवाब देंहटाएं
  3. धन्यवाद संकेत. हा लेख तेवढाच काय तो माझ्या इवल्याशा साहित्यसंपदेचा कळस (की कहर?) आहे. :P :D

    जवाब देंहटाएं
  4. finally vachla mi lekh. tujhi bhashevarchi pakad kautukaspad aahe. mastach lihila aahes. looking forward to read more from you. :)- mrudul

    जवाब देंहटाएं