08 जून 2013

पर्वणी

रुक्ष आयुष्यास या अवचित मिळाली पर्वणी
आज वळणावर जुन्या नजरेत अडखळले कुणी
एक चेहरा गोजिरा नयनांत भिरभिरला क्षणी
​धस्स झाले मन्मनी, लवते न लवते पापणी

गतस्मृतींची पाखरे झेपावली तारांगणी
माळ तुटुनी सांडले हळव्या क्षणांचे तन्मणी
बांध फुटला अंतरी, छेदे फुगा जणु टाचणी
मुक्त झाल्या भावना, जणु वारुळातुन नागिणी

मेघ झरले दाटलेले आर्त व्याकुळ अंगणी
चहुकडे ग्रीष्मातही हिरवळ पसरली श्रावणी
चंद्र पुनवेचा जणू बघुनी सुखावे चांदणी
जणु हरीच्या बासरीने मुग्ध व्हाव्या गवळणी

सत्य की स्वप्नात मी, कोठे करावी चाचणी
​अनुभुतीची या कशी शब्दात व्हावी मांडणी
दर्शनातच तृप्त मी, उरली न दुसरी मागणी
'भेट' ही​ अनमोल​, झालो आज नशिबाचा ऋणी

- अनामिक
(१३/१२/२०१० - १९/१२/२०१० आणि ३०/०५/२०१३ - ०५/०६/२०१३)

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें