11 नवंबर 2012

चांदवा नाही अता (गझल)

वाहती नुसतेच वारे, गारवा नाही अता
दरवळे श्वासात सा-या, ती हवा नाही अता

तीच दुनिया, तीच गजबज, अंगणी तरि शांतता
धुंद किलबिल पाखरांचा तो थवा नाही अता

रात्र नेई दूर, सोबत कैक लुकलुकते दिवे
कुट्ट वाटा उजळणारा काजवा नाही अता

तारका लाखो जरी, अंबर सुने अन कोरडे
चिंब भिजवाया दुधाने चांदवा नाही अता

झोत शब्दांचा पडे कानी, न भिडती भावना
अर्थ मौनाचा कळे, त्या जाणिवा नाही अता

जखडुनी नाती जुनी उरल्यात तुटक्या साखळ्या
जो मने सांधायचा, हळवा दुवा नाही अता

- अनामिक
(०६/११/२०१२ - १०/११/२०१२)

2 टिप्‍पणियां:

  1. कवी अनामिक, सांष्टांग आहे तुम्हाला.
    आम्ही fan आहोत तुमच्या गझलांचे...आमचे गालिब पण तुम्हीच आणि सुरेश भट सुद्धा तुम्हीच.. जियो.

    जवाब देंहटाएं
  2. दाद आणि कौतुकाबद्दल खरंच खूप खूप आभार. :-)
    बाकी तुलनेसाठी उदाहरणे जरा जास्तच वजनदार वापरलीत, तेवढी पेलवायची नाहीत माझ्या गझलेला. :-)

    जवाब देंहटाएं