मूळ कविता : मी मोर्चा नेला नाही मूळ कवी : संदीप खरे विडंबन : मी स्मोकिंग केले नाही (एका सभ्य मुलाची मनोगाथा) मी स्मोकिंग केले नाही मी ड्रिंकिंग केले नाही मी पान सुपारी सुद्धा कधी तोंडी धरले नाही मी स्मोकिंग केले नाही... भवती धिंगाणा चाले तो विस्फारुन बघताना कुणी डिस्को गाजवताना कुणी पोरी नाचवताना मी मूल्यांना तत्त्वांना कवटाळुन बसलो जेव्हा मज बिघडवणारा देखिल कुणी दोस्त भेटला नाही मी स्मोकिंग केले नाही... चुरलेले फॉर्मल कपडे अन् कुरकुरणारी चप्पल केसांची कळकट झुलपे बघणारे करती टिंगल मी मित्रगणांना भ्यालो मी घरच्यांनाही भ्यालो मी घरातसुद्धा माझ्या कधी स्टाइल मारली नाही मी स्मोकिंग केले नाही... मी भिडस्त भोळा पामर बंधनांत करतो वावर शाळेत सभ्य विद्यार्थी कंपनीत लॉयल वर्कर ना हातुन घडली कोठे मस्ती ना मारामारी कधी छेड काढली नाही कधी शिटी मारली नाही मी स्मोकिंग केले नाही... मज कधी दुचाकी मिळता मी 'लुना' निवडली असती अन् कार लाभता नशिबी 'नॅनो'ही पुरली असती मज फिरवाया मिरवाया कुणी तरुणी पटली नाही मी 'बुलेट' घेतली नाही 'ऑडी'ही झेपली नाही मी स्मोकिंग केले नाही... - अनामिक (२४/०१/२०१० - २४/०५/२०१२) ---------------------------------------- मूळ कविता : मी मोर्चा नेला नाही मी मोर्चा नेला नाही मी संपही केला नाही मी निषेध सुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही मी मोर्चा नेला नाही... भवताली संगर चाले तो विस्फ़ारुन बघताना कुणी पोटातून चिडताना कुणी रक्ताळून लढताना मी दगड होउनी थिजलो रस्त्याच्या बाजूस जेव्हा तो मारायाला देखिल मज कुणी उचलले नाही मी मोर्चा नेला नाही... नेमस्त झाड मी आहे मूळ फांद्या जिथल्या तेथे पावसात हिरवा झालो थंडीत गाळली पाने पण पोटातून कुठलीही खजिन्याची ढोली नाही कुणी शस्त्र लपवले नाही कधी गरूड बैसला नाही मी मोर्चा नेला नाही... धुतलेला सात्विक सदरा तुटलेली एकच गुंडी टकलावर अजून रुळते अदृश्य लांबशी शेंडी मी पंतोजींना भ्यालो मी देवालाही भ्यालो मी मनात सुद्धा माझ्या कधी दंगा केला नाही मी मोर्चा नेला नाही... मज जन्म फळाचा मिळता मी 'केळे' झालो असतो मी असतो जर का भाजी तर 'भेंडी' झालो असतो मज चिरता चिरता कोणी रडले वा हसले नाही मी 'कांदा' झालो नाही 'आंबा'ही झालो नाही मी मोर्चा नेला नाही... - संदीप खरे
25 जनवरी 2010
मी स्मोकिंग केले नाही (विडंबन)
Labels:
मराठी - विडंबन,
Personal favorites
17 जनवरी 2010
मी कोडिंग केले नाही (विडंबन)
(एका सॉफ्टवेअर इंजीनियरची मनोगाथा)
मी कोडिंग केले नाही टेस्टिंग ही केले नाही मी रिपोर्ट सुद्धा साधा कधी पाठवलेला नाही मी कोडिंग केले नाही... भवती डेवलपमेंट चाले ती विस्फारुन बघताना कुणी प्रोग्राम चालवताना कुणी बग फिक्सिंग करताना मी मठ्ठासारखा बसलो टीम मेंबर सोबत जेव्हा कंपाइल कराया देखिल त्याने हेल्प केली नाही मी कोडिंग केले नाही... बेजबाबदार मी आहे मूळ प्रोजेक्ट जिथल्या तेथे दिवसात ओर्कुटिंग करतो सांजेस उरकतो चॅटिंग पण डोक्यातुन कुठलेही फंडू प्रोग्रामिंग नाही सी-प्लस-प्लस जमले नाही लीनक्स ही कळले नाही मी कोडिंग केले नाही... डोक्यावर लटके जेव्हा डेडलाइन ची तलवार निर्लज्जागत मी घेतो कॉपी-पेस्ट चा आधार मी मॅनेजरला भ्यालो सूपरवाइझरला भ्यालो मी पगारसुद्धा माझा वाढिव मागितला नाही मी कोडिंग केले नाही... मी असतो जर अभ्यासू पी.एच.डी. झालो असतो मी असतो पैसेवाला तर डॉक्टर झालो असतो मज ले-ऑफ करुनी कोणी हसले वा रडले नाही एम.बी.ए. झालो नाही एम.एस. ही झालो नाही मी कोडिंग केले नाही... - अनामिक (१७-०१-२०१०) मूळ कविता : मी मोर्चा नेला नाही मूळ कवी : संदीप खरे
Labels:
मराठी - विडंबन
20 नवंबर 2009
कुठेतरी हरवलोय मी...
कुठेतरी हरवलोय मी...
ऑफिसच्या इमारतीत... कामाच्या व्यापात... कंप्यूटरच्या स्क्रीन मध्ये....
२५ किलोमीटर बाईकच्या प्रवासात... कुठे वाहनांच्या गर्दीत... कुठे सुनसान रस्त्यावर.....
हॉल मधल्या भयाण शांततेत... 'कूक'च्या कंटाळ्वाण्या जेवणात... काळोख्या बेडरूम मध्ये... रात्रीच्या चित्र-विचित्र स्वप्नांमध्ये...
सकाळच्या कर्कश्य अलार्म मध्ये.... घाई-घाईत उराकाव्या लागणा-या तयारीत....
वीक-एंड च्या आळशी मूडमध्ये... निरर्थक नेट सर्फिंग मध्ये... मॉलच्या गजबजाटात....
एकंदरीतच एका अतिशय रटाळ जीवनाच्या चक्रव्यूहामध्ये..... Quarter Life Crisis मध्ये.....
स्वतःला कुठेतरी हरवून बसलोय मी.......
ऑफिसच्या इमारतीत... कामाच्या व्यापात... कंप्यूटरच्या स्क्रीन मध्ये....
२५ किलोमीटर बाईकच्या प्रवासात... कुठे वाहनांच्या गर्दीत... कुठे सुनसान रस्त्यावर.....
हॉल मधल्या भयाण शांततेत... 'कूक'च्या कंटाळ्वाण्या जेवणात... काळोख्या बेडरूम मध्ये... रात्रीच्या चित्र-विचित्र स्वप्नांमध्ये...
सकाळच्या कर्कश्य अलार्म मध्ये.... घाई-घाईत उराकाव्या लागणा-या तयारीत....
वीक-एंड च्या आळशी मूडमध्ये... निरर्थक नेट सर्फिंग मध्ये... मॉलच्या गजबजाटात....
एकंदरीतच एका अतिशय रटाळ जीवनाच्या चक्रव्यूहामध्ये..... Quarter Life Crisis मध्ये.....
स्वतःला कुठेतरी हरवून बसलोय मी.......
Labels:
मराठी - लेख
20 मई 2008
ख्वाइश है क्यों (गजल)
हार से मिलकर गले अब जीत की ख्वाइश है क्यों
फूल सब मुरझा गए, दिल चाहता बारिश है क्यों
गूँजते थे महफिलों में गीत जब, मैं चुप रहा
फूल सब मुरझा गए, दिल चाहता बारिश है क्यों
सामने थी मंजिले, मैं सहमकर धीमे चला
अब बिछे हैं फासले, भगदौड की कोशिश है क्यों
झिलमिलाती रात में भी चाँद को छू ना सका
अब अमावस है घनी, दिल ढूँढता गर्दिश है क्यों
गूँजते थे महफिलों में गीत जब, मैं चुप रहा
अब विरानों में लबों पे एक फर्माइश है क्यों
तेज जीवन का जुआ था, तब न खेली बाजियाँ
अब पडे फाँसे गलत, तकदीर से रंजिश है क्यों
- अनामिक
(१८-२०/०५/२००८)
(१८-२०/०५/२००८)
Labels:
हिंदी - गझल
23 मार्च 2005
हे असंच चालत राहील काय ?
तुझं स्वप्न बघण्यातच माझं जीवन संपून जाईल काय ?
प्रश्न सतवतो, शेवटपर्यंत हे असंच चालत राहील काय ? ॥ धॄ ॥
रोज सकाळी लवकर येतो
कॉलेजपाशी उभा राहतो
आता येशिल, नंतर येशिल
खुळ्यासारखा वाट पाहतो
उशीर होतोय, जाणवतं, पण जागीच खिळतात पाय ॥ १ ॥
कॉलेजमध्ये शिरल्यापासून
नजर सारखी भटकत असते
इथल्या वळणा-वळणावरती
तुझाच चेहरा शोधत बसते
तुला भेटण्याचा कुठलाही नाही सुचत उपाय ॥ २ ॥
कधी अचानक समोर आलीस
मी बोलायचा प्रयत्न करतो
तू तर लक्षही देतच नाहीस
माझा स्वर कंठातच विरतो
हळवे डोळे दाटून येतात, होतो मी असहाय ॥ ३ ॥
- अनामिक
(२३/०३/२००५)
प्रश्न सतवतो, शेवटपर्यंत हे असंच चालत राहील काय ? ॥ धॄ ॥
रोज सकाळी लवकर येतो
कॉलेजपाशी उभा राहतो
आता येशिल, नंतर येशिल
खुळ्यासारखा वाट पाहतो
उशीर होतोय, जाणवतं, पण जागीच खिळतात पाय ॥ १ ॥
कॉलेजमध्ये शिरल्यापासून
नजर सारखी भटकत असते
इथल्या वळणा-वळणावरती
तुझाच चेहरा शोधत बसते
तुला भेटण्याचा कुठलाही नाही सुचत उपाय ॥ २ ॥
कधी अचानक समोर आलीस
मी बोलायचा प्रयत्न करतो
तू तर लक्षही देतच नाहीस
माझा स्वर कंठातच विरतो
हळवे डोळे दाटून येतात, होतो मी असहाय ॥ ३ ॥
- अनामिक
(२३/०३/२००५)
Labels:
मराठी - कविता
14 फ़रवरी 2005
काय तुझ्या मनात
किती काळ माझ्या आशेचा झुलवशील झोका ?
काय तुझ्या लपलंय मनामधे, जरा सांगशिल का ? ॥ धॄ ॥
कधी दुरून मी दिसलो की नजरेस नजर मिळते
कधी मला बघता, बाजूला मान तुझी वळते
कटाक्ष तिरपा तुझा, चुकवतो हृदयाचा ठोका ॥ १ ॥
कधी मला पाहून तुझ्या गालात हास्य फुटते
मी हसताच तुझ्या ओठांची कळी घट्ट मिटते
तुझ्या अशा वर्तनामुळे होतो माझा विचका ॥ २ ॥
कधी दोन गप्पा माझ्याशी दिलखुलास करतेस
कधी शब्दही बोलत नाही, चक्क मौन धरतेस
उमजत नाही, तुला अचानक का येतो झटका ॥ ३ ॥
काय तुझ्या लपलंय मनामधे, जरा सांगशिल का ? ॥ धॄ ॥
कधी दुरून मी दिसलो की नजरेस नजर मिळते
कधी मला बघता, बाजूला मान तुझी वळते
कटाक्ष तिरपा तुझा, चुकवतो हृदयाचा ठोका ॥ १ ॥
कधी मला पाहून तुझ्या गालात हास्य फुटते
मी हसताच तुझ्या ओठांची कळी घट्ट मिटते
तुझ्या अशा वर्तनामुळे होतो माझा विचका ॥ २ ॥
कधी दोन गप्पा माझ्याशी दिलखुलास करतेस
कधी शब्दही बोलत नाही, चक्क मौन धरतेस
उमजत नाही, तुला अचानक का येतो झटका ॥ ३ ॥
मैत्रिणींमधे कुजबुज होते मी आल्यावरती
खाणाखुणा - इशा-यांना त्यांच्या येते भरती
मीच निघुन जातो शरमेने, समजताच धोका ॥ ४ ॥
तुला वाटतो खेळच सारा, झुरतो मीच बिचारा
नाजुक माझे काळिज, त्यावर फिरवू नको निखारा
रहस्य हे उलगडून आता कर माझी सुटका ॥ ५ ॥
- अनामिक
(१४/०२/२००५)
Labels:
मराठी - कविता
31 जनवरी 2005
एक दिवशी
एक दिवशी अशी भेट अपुली घडावी
रास वाटेत फुलत्या कळ्यांची पडावी
आसमंतामधे गंध त्यांचा भरावा
धुंदल्या त्या क्षणी प्रीत अपुली जडावी
एक दिवशी सरी श्रावणाच्या पडाव्या
भावनांच्या रुपे काळजाला भिडाव्या
प्रेमवाटेवरी चिंब दोघे भिजावे
पाहुनी सोहळा हा विजा कडकडाव्या
एक दिवशी स्वरांनी तुझ्या संग गावे
प्रेमगीतात त्या रागही दंग व्हावे
इंद्रधनुषाकडे मागुनी रंग घ्यावे
स्वप्न डोळ्यांमधे मी तुझे रंगवावे
एक दिवशी तुझा हात हाती धरावा
स्पर्श हॄदयास नजरेतुनी तू करावा
एकमेकांत दोघे असे गुंग व्हावे
दोन जीवांमधे ना उरावा दुरावा
- अनामिक
(२९, ३०, ३१/०१/२००५)
रास वाटेत फुलत्या कळ्यांची पडावी
आसमंतामधे गंध त्यांचा भरावा
धुंदल्या त्या क्षणी प्रीत अपुली जडावी
एक दिवशी सरी श्रावणाच्या पडाव्या
भावनांच्या रुपे काळजाला भिडाव्या
प्रेमवाटेवरी चिंब दोघे भिजावे
पाहुनी सोहळा हा विजा कडकडाव्या
एक दिवशी स्वरांनी तुझ्या संग गावे
प्रेमगीतात त्या रागही दंग व्हावे
इंद्रधनुषाकडे मागुनी रंग घ्यावे
स्वप्न डोळ्यांमधे मी तुझे रंगवावे
एक दिवशी तुझा हात हाती धरावा
स्पर्श हॄदयास नजरेतुनी तू करावा
एकमेकांत दोघे असे गुंग व्हावे
दोन जीवांमधे ना उरावा दुरावा
- अनामिक
(२९, ३०, ३१/०१/२००५)
Labels:
मराठी - कविता,
Personal favorites
23 जनवरी 2005
भिती
गंध तुझ्या हळव्या प्रेमाचा मनात माझ्या दरवळतो
भाव मनातिल तुला सांगण्या मात्र जरा मी अडखळतो
नित्य तुझा सहवास मिळावा, मनात अभिलाषा धरतो
का निष्कारण भिती वाटते, दडपणात मी वावरतो
तू दिसतेस मला जेव्हाही, क्षणात पुरता बावरतो
नजरेलाही नजर भिडवण्या खुळ्यापरी मी घाबरतो
काय म्हणू, अन् काय नको, हा प्रश्न मस्तकी घुटमळतो
घाम कपाळावर फुटलेला गालावरती ओघळतो
बोलावेसे वाटे पुष्कळ, विषय एकही ना मिळतो
शब्द जिभेवर उमटतात, पण स्वर कंठातच विरघळतो
अजब भितीने थरथरणारे ओठ घट्ट मी आवळतो
फक्त जरा स्मितहास्य मुखावर दाखवतो, अन् मी पळतो
ध्यानी येतो मूर्खपणा, अन् नकळत मी मागे वळतो
उशीर झाला एव्हाना, हे जाणवता मी हळहळतो
पुन्हा एकदा पराभूत मी, जीव अंतरी तळमळतो
किती मनाला आवरतो, पण एक तरी अश्रू गळतो
- अनामिक
(१७, २१, २३/०१/२००५)
भाव मनातिल तुला सांगण्या मात्र जरा मी अडखळतो
नित्य तुझा सहवास मिळावा, मनात अभिलाषा धरतो
का निष्कारण भिती वाटते, दडपणात मी वावरतो
तू दिसतेस मला जेव्हाही, क्षणात पुरता बावरतो
नजरेलाही नजर भिडवण्या खुळ्यापरी मी घाबरतो
काय म्हणू, अन् काय नको, हा प्रश्न मस्तकी घुटमळतो
घाम कपाळावर फुटलेला गालावरती ओघळतो
बोलावेसे वाटे पुष्कळ, विषय एकही ना मिळतो
शब्द जिभेवर उमटतात, पण स्वर कंठातच विरघळतो
अजब भितीने थरथरणारे ओठ घट्ट मी आवळतो
फक्त जरा स्मितहास्य मुखावर दाखवतो, अन् मी पळतो
ध्यानी येतो मूर्खपणा, अन् नकळत मी मागे वळतो
उशीर झाला एव्हाना, हे जाणवता मी हळहळतो
पुन्हा एकदा पराभूत मी, जीव अंतरी तळमळतो
किती मनाला आवरतो, पण एक तरी अश्रू गळतो
- अनामिक
(१७, २१, २३/०१/२००५)
Labels:
मराठी - कविता,
Personal favorites
14 जनवरी 2005
फूल
रंगबिरंगी कळ्या-फुलांनी फुलली होती बाग
पानांतुन डोकावत होता गोंडस एक गुलाब
फूल गोजिरे मनात भरण्याइतके होते छान
किती पाहिले तरी शमेना नजरेतली तहान
भुरळ अशी पडली की नकळत तिथेच खिळले पाय
जीव जडावा असे न जाणे फुलात होते काय ?
कुरवाळीन जरा प्रेमाने, विचार सुचला असा
स्पर्श मखमली, गालावर, अन मनी उठावा ठसा
श्वासामध्ये भरून घेइन त्याचा मोहक सुवास
क्षणात केला खुळ्या मनाने स्वप्नायुगाचा प्रवास
"फूल तोडण्या सक्त मनाई", दाखविणा-या धाक
फलकावरल्या सूचनेकडे केली डोळेझाक
मोह अनावर इतका झाला, पुढे सरकला हात
फूल कोठले ? निराळेच लिहिले होते नशिबात
पानांमागे दडलेल्या काट्याने केला घात
खुपला बोटाला, पण झाली जखम खोल हृदयात
धुंदीतुन शुद्धीवर आलो, तिथे उमगली चूक
धार दिसत होती रक्ताची, फूल मात्र अंधूक
स्वप्ने रंगवल्याची शिक्षा, की नशिबाचा रोष
फुलास देऊ, काट्याला, की स्वतःस देऊ दोष ?
- अनामिक
(१४/०१/२००५)
(कविता तशी जुनी आहे. वैयक्तिक आवडत्या कवितांपैकी एक..)
Labels:
मराठी - कविता,
Personal favorites
09 अगस्त 2001
फुलराणी
रिमझिम रिमझिम बरसत होत्या हळव्या श्रावणधारा
पाखरांसवे धुंदगतीने खेळत होता वारा
पाने होती गात सुराने चैतन्याची गाणी
कुठून चाहुल गोड लागली, दिसली मज फुलराणी
सोनपावलांच्या नादाने तिचे आगमन झाले
वर्षाजलात इंद्रधनूचे रंग मिसळले ओले
गंध मृदेचा द्विगुणित केला तिच्या पदोस्पर्शाने
आसमंतही भरून आला सळसळत्या हर्षाने
शुभ्र विजांची मैफल जमली गगनी फेर धराया
मेघांचाही पूर लोटला फुलराणीस पहाया
सौंदर्याने तिच्या मिळाला नूर नवा गगनाला
पहा चंद्रही कसा लाजला तिच्या गौरवर्णाला
हृदय धडकले पाषाणांचे मंजुळ तिच्या स्वराने
तिच्या मुखीचे गीत ऐकण्या वळली पाने-पाने
करस्पर्शाने तिच्या बहरला प्रेमफुलांचा वाफा
तिच्या निरागस लीलांवरती खुदकन हसला चाफा
जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी तिने फुलवला श्वास
रंगबिरंगी नवस्वप्नांची जगी विखुरली रास
आगमनाने फुलराणीच्या रचली एक कहाणी
चराचराने अस्तित्वाची तिच्या गायली गाणी
- अनामिक
(०९/०८/२००१)
पाखरांसवे धुंदगतीने खेळत होता वारा
पाने होती गात सुराने चैतन्याची गाणी
कुठून चाहुल गोड लागली, दिसली मज फुलराणी
सोनपावलांच्या नादाने तिचे आगमन झाले
वर्षाजलात इंद्रधनूचे रंग मिसळले ओले
गंध मृदेचा द्विगुणित केला तिच्या पदोस्पर्शाने
आसमंतही भरून आला सळसळत्या हर्षाने
शुभ्र विजांची मैफल जमली गगनी फेर धराया
मेघांचाही पूर लोटला फुलराणीस पहाया
सौंदर्याने तिच्या मिळाला नूर नवा गगनाला
पहा चंद्रही कसा लाजला तिच्या गौरवर्णाला
हृदय धडकले पाषाणांचे मंजुळ तिच्या स्वराने
तिच्या मुखीचे गीत ऐकण्या वळली पाने-पाने
करस्पर्शाने तिच्या बहरला प्रेमफुलांचा वाफा
तिच्या निरागस लीलांवरती खुदकन हसला चाफा
जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी तिने फुलवला श्वास
रंगबिरंगी नवस्वप्नांची जगी विखुरली रास
आगमनाने फुलराणीच्या रचली एक कहाणी
चराचराने अस्तित्वाची तिच्या गायली गाणी
- अनामिक
(०९/०८/२००१)
Labels:
मराठी - कविता,
Personal favorites
23 जून 2001
हाक
का रुसलीस प्रिये, तुटली का क्षणात प्रीती सारी ?
चाललीस का दूर दूर मग सोडुन साथ अधूरी ?
चाललीस का दूर दूर मग सोडुन साथ अधूरी ?
आनंदाच्या पावसात तू, दुःखाच्या दुष्काळी
साथ दिलीस मला विरलेल्या भकास सांज-सकाळी
कधी यशाच्या मुकुटामध्ये चमचमणारा मोती
पराभवाच्या तिमिरामध्ये तूच उजळल्या ज्योती
कधी यशाच्या मुकुटामध्ये चमचमणारा मोती
पराभवाच्या तिमिरामध्ये तूच उजळल्या ज्योती
हास्याचा क्षण जगतानाही फुलवलेस तू ओठ
दिलीस हिम्मत रिचवायाला तू अश्रूंचा घोट
काट्यांनी भरलेला रस्ता, कधी फुलांची वाट
पार कराया दिलास हाती तू प्रेमाचा हात
काट्यांनी भरलेला रस्ता, कधी फुलांची वाट
पार कराया दिलास हाती तू प्रेमाचा हात
कोण तुझ्यावाचून भावना समजुन घेइल माझ्या
स्पर्शावाचुन तुझ्या, मनाच्या जखमा उरतिल ताज्या
आर्त वेदना तळमळेल मग काळजात जळणा-या
तुझ्या फुंकरीविना कधी या ठिणग्या विझतिल सा-या
आर्त वेदना तळमळेल मग काळजात जळणा-या
तुझ्या फुंकरीविना कधी या ठिणग्या विझतिल सा-या
साद घालतो, ये माघारी, शतदा पडतो पाया
तुझ्याविना हे जीवन म्हणजे प्राणांवाचुन काया
क्षमा मागतो गुन्हा कोणता घडला असला त्याची
किती याचना करू, ऐक ना हाक तुझ्या वेड्याची
क्षमा मागतो गुन्हा कोणता घडला असला त्याची
किती याचना करू, ऐक ना हाक तुझ्या वेड्याची
- अनामिक
(२१,२२,२३/०६/०१)
(संदर्भ - ही कविता ’कविते’ला, म्हणजेच काव्याला उद्देशून लिहिलेली आहे. या कवितेतील सखी म्हणजे ’कविता’ आहे.)
Labels:
मराठी - कविता
31 मई 2001
क्षितिज
रंग उधळले कुणि आकाशी
क्षितिजावर ओघळली लाली
ओठांच्या दाबून पाकळ्या
जणु युवती गालात लाजली
सांजवात सुटला वेगाने
क्षितिजाला बिलगाया आतुर
जणु सूर्याने आभाळातुन
हळुच घातली शीतल फुंकर
लालबुंद तेजाचा गोळा
दिनकर अवतरला क्षितिजावर
जणु प्रेमाने मोहरलेल्या
स्वप्नप्रियेला भेटे प्रियकर
बुडू लागला सूर्य सागरी
अंधाराने विणले जाळे
जणु क्षितिजाने वस्त्र नेसले
चमचमत्या ता-यांचे काळे
- अनामिक
(मे २००१)
क्षितिजावर ओघळली लाली
ओठांच्या दाबून पाकळ्या
जणु युवती गालात लाजली
सांजवात सुटला वेगाने
क्षितिजाला बिलगाया आतुर
जणु सूर्याने आभाळातुन
हळुच घातली शीतल फुंकर
लालबुंद तेजाचा गोळा
दिनकर अवतरला क्षितिजावर
जणु प्रेमाने मोहरलेल्या
स्वप्नप्रियेला भेटे प्रियकर
बुडू लागला सूर्य सागरी
अंधाराने विणले जाळे
जणु क्षितिजाने वस्त्र नेसले
चमचमत्या ता-यांचे काळे
- अनामिक
(मे २००१)
Labels:
मराठी - कविता
24 अप्रैल 2001
कविता
कविता असते मनी उमलत्या भावनांचा फुलोरा
श्रावणातल्या रिमझिमणा-या ओल्या विचारधारा
कविता असते रंगबिरंगी आकांक्षांची थाळी
डोळ्यामध्ये अंकुरलेल्या स्वप्नांची रांगोळी
कविता असते आनंदाच्या धुंदीचा हुंकार
आत कोंडलेल्या अश्रूंना पाझरणारे द्वार
कविता असते रेशिम झालर सौख्याच्या वस्त्राला
दुःखाचीही सुरेख गुंफण करणारी फुलमाला
कविता असते सरस्वतीचे तेजस्वी वरदान
मनामधे जपलेले हिरवे नाजुक पिंपळपान
- अनामिक
(२४/०४/२००१)
श्रावणातल्या रिमझिमणा-या ओल्या विचारधारा
कविता असते रंगबिरंगी आकांक्षांची थाळी
डोळ्यामध्ये अंकुरलेल्या स्वप्नांची रांगोळी
कविता असते आनंदाच्या धुंदीचा हुंकार
आत कोंडलेल्या अश्रूंना पाझरणारे द्वार
कविता असते रेशिम झालर सौख्याच्या वस्त्राला
दुःखाचीही सुरेख गुंफण करणारी फुलमाला
कविता असते सरस्वतीचे तेजस्वी वरदान
मनामधे जपलेले हिरवे नाजुक पिंपळपान
- अनामिक
(२४/०४/२००१)
Labels:
मराठी - कविता
14 मार्च 2001
श्रीमंत - गरीब
श्रीमंतांचे इथे चोचले
कोण पुसे गरिबाच्या इच्छा
धनिकावर वर्षाव सुखाचा
दुःख करी गरिबाचा पिच्छा ॥ धॄ ॥
वस्त्र भरजरी लेउन अंगी
धनिक करी श्रृंगार नाटकी
शरिर लपवण्या पुरी न पडती
गरिबाची लक्तरे फाटकी ॥ १ ॥
टोलेजंग महालांभवती
सोनेरी जाळ्यांचे कठडे
ऊन-पावसा इथे थरथरे
जुने मोडके अधू झोपडे ॥ २ ॥
मिष्ठान्नाचे ताट गिळुनिया
कुणि देतो तृप्तीचा ढेकर
रित्या मुखाला नशिबी नाही
एक वेळची भाजी भाकर ॥ ३ ॥
समृद्धीची नदी वाहते
धनवानाच्या खुल्या अंगणी
निर्धनास अपुल्या न आवरे
नयनी ओघळणारे पाणी ॥ ४ ॥
- अनामिक
(१४/०३/२००१)
कोण पुसे गरिबाच्या इच्छा
धनिकावर वर्षाव सुखाचा
दुःख करी गरिबाचा पिच्छा ॥ धॄ ॥
वस्त्र भरजरी लेउन अंगी
धनिक करी श्रृंगार नाटकी
शरिर लपवण्या पुरी न पडती
गरिबाची लक्तरे फाटकी ॥ १ ॥
टोलेजंग महालांभवती
सोनेरी जाळ्यांचे कठडे
ऊन-पावसा इथे थरथरे
जुने मोडके अधू झोपडे ॥ २ ॥
मिष्ठान्नाचे ताट गिळुनिया
कुणि देतो तृप्तीचा ढेकर
रित्या मुखाला नशिबी नाही
एक वेळची भाजी भाकर ॥ ३ ॥
समृद्धीची नदी वाहते
धनवानाच्या खुल्या अंगणी
निर्धनास अपुल्या न आवरे
नयनी ओघळणारे पाणी ॥ ४ ॥
- अनामिक
(१४/०३/२००१)
Labels:
मराठी - कविता
15 फ़रवरी 2001
शोध
येईल कुणी मजसाठी
हृदयात घेउनी प्रीती
या खुळ्या भावनेपायी
शून्यात शोधतो नाती
सतरंगी इंद्रधनूच्या
शोधतो कुणाचा चेहरा
डोळ्यात रंग प्रेमाचा
जलधीहुन ज्याच्या गहिरा
वाळूतिल रेषांवरती
शोधतो कुणाचे नाव
स्पर्शाने कळतिल ज्याला
चित्तातिल कोमल भाव
बेधुंद चांदण्या रात्री
पाहतो कुणाची स्वप्ने
स्वर मिसळुन स्वरात माझ्या
कुणि गाइल मधुर तराणे
श्रावणसरीत रिमझिमत्या
पाहतो कुणाची वाट
भिजवेल चिंब हृदयाला
बांधेल रेशमी गाठ
- अनामिक
(१४, १५ /०२/२००१)
हृदयात घेउनी प्रीती
या खुळ्या भावनेपायी
शून्यात शोधतो नाती
सतरंगी इंद्रधनूच्या
शोधतो कुणाचा चेहरा
डोळ्यात रंग प्रेमाचा
जलधीहुन ज्याच्या गहिरा
वाळूतिल रेषांवरती
शोधतो कुणाचे नाव
स्पर्शाने कळतिल ज्याला
चित्तातिल कोमल भाव
बेधुंद चांदण्या रात्री
पाहतो कुणाची स्वप्ने
स्वर मिसळुन स्वरात माझ्या
कुणि गाइल मधुर तराणे
श्रावणसरीत रिमझिमत्या
पाहतो कुणाची वाट
भिजवेल चिंब हृदयाला
बांधेल रेशमी गाठ
- अनामिक
(१४, १५ /०२/२००१)
Labels:
मराठी - कविता
12 जनवरी 2001
शुभेच्छा
गंध फुलांचा घेउन मोहक तुझा जन्मदिन आला
तुजसाठी नवचैतन्याचा वसंत ऋतू बहरला
आयुष्याने तुला चढवला नव्या वयाचा साज
असंख्य देतो तुला शुभेच्छा मनापासुनी आज
मनी फुलव तू नवीन स्वप्ने, नव्या नव्या आकांक्षा
आयुष्यात यशस्वी हो तू सगळ्या कठिण परिक्षा
सफल होउ दे तुझ्या मनीषा, तुझे ध्येय, अन् आशा
असेल याहुन दुसरी तिसरी माझी काय अपेक्षा
दुख, निराशा स्वप्नालाही तुझ्या कधी ना येवो
हास्य तुझ्या या चेह-यावरचे सदैव चमकत राहो
आनंदाची नित्य तुझ्यावर होऊ दे बरसात
सुख, समृद्धी आणि यशाची तुला मिळू दे साथ
दीर्घायुष तू होशिल, करतो प्रार्थना ईश्वरास
नाव स्वताचे उज्वल करशिल, आहे मज विश्वास
वाटेवरती चालताना यशाच्या तू, तुजसाठी
माझ्या नित्य सदिच्छा असतिल वळणा-वळणावरती
- अनामिक
(१२/०१/२००१)
तुजसाठी नवचैतन्याचा वसंत ऋतू बहरला
आयुष्याने तुला चढवला नव्या वयाचा साज
असंख्य देतो तुला शुभेच्छा मनापासुनी आज
मनी फुलव तू नवीन स्वप्ने, नव्या नव्या आकांक्षा
आयुष्यात यशस्वी हो तू सगळ्या कठिण परिक्षा
सफल होउ दे तुझ्या मनीषा, तुझे ध्येय, अन् आशा
असेल याहुन दुसरी तिसरी माझी काय अपेक्षा
दुख, निराशा स्वप्नालाही तुझ्या कधी ना येवो
हास्य तुझ्या या चेह-यावरचे सदैव चमकत राहो
आनंदाची नित्य तुझ्यावर होऊ दे बरसात
सुख, समृद्धी आणि यशाची तुला मिळू दे साथ
दीर्घायुष तू होशिल, करतो प्रार्थना ईश्वरास
नाव स्वताचे उज्वल करशिल, आहे मज विश्वास
वाटेवरती चालताना यशाच्या तू, तुजसाठी
माझ्या नित्य सदिच्छा असतिल वळणा-वळणावरती
- अनामिक
(१२/०१/२००१)
Labels:
मराठी - कविता,
Personal favorites
05 दिसंबर 2000
आठवणी
कालपाखरू जाते उडुनी, मागे उरती आठवणी
अश्रूंचा महापूर उमलतो नयनांमध्ये क्षणोक्षणी
अनेक व्यक्ती, असंख्य छाया जीवनात येती जाती
त्यांनी उजळविल्या दीपांच्या राहतात जळक्या वाती
कुणी खास मनवाटिकेमधे फुलवुन जाते गोड फुले
आता उरल्या कुस्करलेल्या पाकळ्यांसवे जीव झुले
तृप्तीच्या सागरात कोणी न्हाउ घालते दशोदिशा
सागर सुकतो, उरती वाळूवरल्या त्या फसव्या रेषा
स्मॄतींच्या काट्यांत अडकुनी फाटुन जाते अंग पुरे
रक्ताचा मग पाट वाहतो, आत खोलवर जखम उरे
- अनामिक
(०५/१२/२०००)
अश्रूंचा महापूर उमलतो नयनांमध्ये क्षणोक्षणी
अनेक व्यक्ती, असंख्य छाया जीवनात येती जाती
त्यांनी उजळविल्या दीपांच्या राहतात जळक्या वाती
कुणी खास मनवाटिकेमधे फुलवुन जाते गोड फुले
आता उरल्या कुस्करलेल्या पाकळ्यांसवे जीव झुले
तृप्तीच्या सागरात कोणी न्हाउ घालते दशोदिशा
सागर सुकतो, उरती वाळूवरल्या त्या फसव्या रेषा
स्मॄतींच्या काट्यांत अडकुनी फाटुन जाते अंग पुरे
रक्ताचा मग पाट वाहतो, आत खोलवर जखम उरे
- अनामिक
(०५/१२/२०००)
Labels:
मराठी - कविता
सदस्यता लें
संदेश (Atom)